कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव आता कोल्हापुरातही हळूहळू वाढू लागला आहे (Kolhapur Corona Update). कोल्हापुरात कोरोनाबाधितांची संख्या 20 वर पोहोचली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूरमधील परिस्थिती आजच्याघडीला चांगली असली तरी गेल्या काही दिवसांपासून मुंबई-पुणेसह राज्यभरातून येणाऱ्या प्रवाशांचं प्रमाण वाढलं आहे. विशेष म्हणजे 20 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 8 रुग्ण हे मुंबईहून प्रवास करुन आले आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे (Kolhapur Corona Update).
कोल्हापूरमध्ये मुंबई-पुण्यातून येणाऱ्या प्रवाशांनी आरोग्य यंत्रणेची झोप उडवली आहे. रेड झोनमधून जिल्ह्यात येणाऱ्यांची सक्तीने तपासणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. मात्र, कोल्हापुरात येणाऱ्या लोकांच्या तुलनेत यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा धोका आणखीन वाढला आहे.
पुणे विभागात विशेषतः पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत आहे. त्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा नियंत्रणात आहे. पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पुढाकार घेत मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात येणारी वाहतूक बंद केली होती. मात्र, तरीदेखील काही नागरिक अवैधरित्या चुप्यामार्गीने प्रवास करुन कोल्हापुरात दाखल झाले.
कोल्हापुरात बाहेरुन आलेल्या लोकांमुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबधितांचा आकडा वाढू लागला आहे. पुण्याहून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. त्यापाठोपाठ या व्यक्तीच्या बहिणीलादेखील कोरोनाची लागण झाली. हळूहळू आकडा वाढत गेला. हा आकडा आता 20 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे यात 8 रुग्णांचं मुंबई कनेक्शन आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने लॉकडाऊन पुन्हा वाढण्याचे संकेत मिळत आहेत. परिणामी, नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर असलेले लोक पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी धडपडत आहेत. तब्बल 19 हजार 700 हून अधिक नागरिकांनी जिल्ह्यात परत येण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे.
कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांचे हे प्रमाण पाहता आरोग्य यंत्रणा आता अधिक सतर्क झाली असून जिल्ह्यात दहा ठिकाणी स्वॅब कलेक्शन सेंटर नव्याने सुरु करण्यात आले आहेत. तर कागल जवळील आरटीओ चेकपोस्टच्या इमारतीत कोरोना केअर सेंटरदेखील उभारण्यात आलं आहे.
कोल्हापूर जिल्हा ऑरेंज झोनमध्ये येत असल्यान येथील बहुतांश व्यवहार सुरळीत सुरु आहेत. मात्र, मुंबई-पुणे सारख्या शहरांमधून येणाऱ्या नागरिकांची संख्या गेल्या चार दिवसात वाढली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. कोल्हापुरात काल (12 मे) 3 नवे रुग्ण आढळले आहेत. यापैकी 2 रुग्ण हे मुंबईहून आलेले आहेत.
रेड झोनमधून येणाऱ्या सर्वांना तपासणी सक्तीची केली असली तरी तितकी यंत्रणा जिल्हा प्रशासनाकडे नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबधितांचा आकडा वाढण्याची भीती प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
संबंधित बातम्या :
‘कोरोना’ला हरवणारी 94 वर्षीय आजी, महाराष्ट्रातील सर्वात वयोवृद्ध रुग्णाची कोरोनावर मात