कोल्हापूर: केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन गेल्या 6 दिवसांपासून सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणारे अमित शाह कोण आहेत? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी विचारलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज कोल्हापूर, पुणे, बारामती, औरंगाबादेत आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं.(Raju shetty agitation against new Agricultural law)
“हे पंजाबच्या, हरियाणाच्या शेतकऱ्यांचं आंदोलन नाही, देशातील शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. शेतकरी म्हणजे काय अतिरेकी आहे का? पोलीस बळाचा वापर का? आम्ही न्याय मागतोय. तीन विधेयकं मंजूर केली त्याचा परिणाम देशातील शेतकऱ्यांवर होणार आहे. कोणत्याही शेतकऱ्यांसोबत चर्चा न करता ही विधेयकं का लादली? आमची बाजू मांडण्याची संधी दिली नाही. गेल्या सहा महिन्यात पंतप्रधानांना अनेक पत्र लिहिली, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही”, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी केंद्र सरकार आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
दिल्लीत थंडीमध्ये कुडकुडत बसलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार चुकीची वागणूक देत आहे. या पाषाणहृदयी सरकारला शेतकऱ्यांची दया आली नाही. गेल्या सहा महिन्यांपासून पत्रव्यवहार करतोय. केंद्रानं कुठलाही शेतकरी, कुठल्याही शेतकरी संघटनेसोबत चर्चा केली नाही. मग हे कायदे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा अधिकार सरकारला कुणी दिला? असा सवाल राजू शेट्टी यांनी केलाय. गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या पत्रव्यवहाराला प्रतिसाद नाही. म्हणून भीक मागण्यासाठी बळीराजाला दिल्लीला जावं लागलं आणि तिथं गेल्यावर त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारले, लाठीमार केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, हे चालणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिलाय.
तिकडे चीन देशात घुसण्याचा प्रयत्न करतोय. तिथे सरकार हिंमत दाखवत नाही. इकडे निरपराध शेतकऱ्यांवर लाठ्या चालवण्यात हे सरकार धन्यता मानत आहे, अशी टीकाही शेट्टींनी केलीय. दिल्लीत लढणारा शेतकरी एकटा नाही, आम्ही त्यांच्यासोबत आहोत, हे सांगण्यासाठीच आजचं आंदोलन असल्याचं शेट्टी म्हणाले.
हे सर्वजण उद्योगपतींना विकले गेले आहेत. हे कायदे उद्योगपतींना शेतकऱ्यांना लुटता यावं म्हणून केले गेले आहेत. हे सगळेजण हस्तक म्हणून काम करत आहेत, हे सांगताना आपल्याला दु:ख होत असल्याचं शेट्टी म्हणाले. आंदोलनावेळी राजू शेट्टी यांनी राज्य सरकारलाही इशारा दिला आहे. राज्य सरकारनं केंद्राच्या कायद्याची अंमलबजावणी न करण्याच्या निर्णयाचं स्वागत आहे. पण राज्यातील शेतकऱ्यांच्या भावना जर केंद्रापर्यंत पोहोचवल्या नाहीत तर महाराष्ट्रात दिल्लीपेक्षाही मोठा उद्रेक पाहायला मिळेल, असा इशारा शेट्टी यांनी ठाकरे सरकारला दिलाय.
येणाऱ्या दोन दिवसांत केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निर्णय घेतला नाही, तर एकाही केंद्रीय मंत्र्याला राज्यात फिरु देणार नाही. त्यांच्या कार्यक्रमात घुसून तो उधळून लावू असा इशाराच राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला दिलाय.
दरम्यान, कोल्हापुरात राजू शेट्टी यांचं आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिस दाखल झाले. त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राजू शेट्टी यांना आंदोलन स्थळावरुन दूर घेऊन जात असताना पोलिस आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही झाल्याचं पाहायला मिळालं.
महत्वाच्या घडामोडी LIVE https://t.co/8hnabwQtwL
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 1, 2020
संबंधित बातम्या:
Raju shetty agitation against new Agricultural law