शिवसेनेतून कुंडलिक खाडे यांची हकालपट्टी, क्लीप व्हायरल झाल्याने झाली कारवाई
धनंजय मुंडे यांनी देखील कुंडलिक खांडे यांच्यावर टिका केली होती. दोन दिवसांपूर्वी कुंडलिक खांडे यांची कथित ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती.
पक्ष विरोधी कारवाई केल्याचा फटका शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना अखेर बसला आहे. त्याची हक्कालपट्टी करण्यात आल्याचे शिवसेना सचिव संजय मोरे यांनी म्हटले आहे. कुंडलिक खांडे आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते शिवराज बांगर यांच्यातील संवादाची कथित ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. बीडमध्ये भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा मोठा पराभव झाला आहे. महाराष्ट्रात लोकसभेला कमी जागा मिळाल्यानंतर महायुतीत घटक पक्षांमध्ये कोणी काम केले कोणी मदत केली नाही याची झाडाझडती सुरु असून आरोपप्रत्यारोप होत आहेत. त्यात ही कथित ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी अजित गटाने नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी टीका केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातील शिवसेनेचे बीडचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची एक ऑडिओ क्लिप दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये कुंडलिक खांडे यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले होते. आपण आपल्या आयुष्यात पहिल्यांदा पंकजा मुंडे यांना धोका दिल्याचे या ऑडीओ क्लीपमध्ये कुंडलिक खांडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे महायुतीत मोठं वादळ निर्माण झाले आहे. बीड लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे निवडून आले आहेत. पंकजा मुंडे यांचा मोठा पराभव झाला आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाच्या फटका या ठिकाणी बसला असल्याचे म्हटले जात आहे. धनंजय मुंडे यांनी देखील कुंडलिक खांडे यांच्यावर टिका केली होती. दोन दिवसांपूर्वी कुंडलिक खांडे यांची कथित ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
कार्यलयाची झाली होती तोडफोड
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिवराज बांगर आणि शिंदे गटाचे कुंडलिक खांडे यांच्या दरम्यान झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ही क्लिप लोकसभा निवडणुकीच्या काळातील असल्याचे म्हटले जात होते. या क्लिपमध्ये शिंदे गटाचे कुंडलिक खांडे हे मी पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिला, असं म्हणत असल्याचं ऐकू येत आहे. आपण 376 बुथवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना मदत केली, असं कुंडलिक खांडे म्हणाले होते. कुंडलिक खांडे हे शिंदे गटाचे बीडचे जिल्हाप्रमुख आहेत त्यांच्या आता कारवाई केली आहे. या संदर्भात शिवसेना सचिव संजय मोरे यांनी पत्रक प्रसिद्धीला दिले आहे. संबधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले होते. बीड शहरातील जालना रोडवर असलेले खांडे यांचे कार्यालय जमावाने दगडफेक करुन तोडले होते.