लालू प्रसाद यादव यांच्या किडनीचं केवळ 25 टक्के फंक्शन; प्रकृती बिघडली
लालूप्रसाद यादव यांना जवळपास 20 वर्षांपासून मधूमेह आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती झपाट्याने बिघडत आहे. | Lalu Prasad Yadav
पाटणा: राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. लालू प्रसाद यादव यांचे एक मूत्रपिंड निकामी होण्याच्या मार्गावर आहे. (Lalu Prasad Yadav health condition Deteriorating)
सध्या लालू प्रसाद यादव यांच्यावर रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. उमेश प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या लालू यादव यांचे मूत्रपिंड 25 टक्केच कार्यरत आहे. हे मूत्रपिंड कधीही निकामी होऊ शकते. आम्ही वरिष्ठांना याबाबत माहिती कळवल्याचे डॉ. उमेश प्रसाद यांनी सांगितले. लालूप्रसाद यादव यांना जवळपास 20 वर्षांपासून मधूमेह आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती झपाट्याने बिघडत आहे. सध्या त्यांच्या मूत्रपिंडाची परिस्थिती गंभीर आहे.गेल्याच आठवड्यात लालूप्रसाद यादव यांना खासगी वॉर्डात हलवण्यात आले होते.
लालूप्रसाद यादव यांची तब्येत बिघडल्यामुळे माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय यांनी नुकतीच रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली होती. यानंतर ‘राजद’च्या काही आमदारांनीही लालूंची भेट घेतली होती.
‘लालूप्रसाद यादवांकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न’
बिहार विधानसभा निवडणुकीनंतर लालूप्रसाद यादव यांच्याकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लीपही व्हायरल झाली होती. मात्र, ‘राजद’ने हे सर्व आरोप फेटाळले होते.
या सगळ्या प्रकरणापूर्वी लालूप्रसाद यादव यांची व्यवस्था एका बंगल्यात करण्यात आली होती. मात्र, हे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांची रवानगी पुन्हा रुग्णालयात झाली होती.
तुरुंगातून बाहेर येण्यासाठी लालूंना करावी लागणार प्रतिक्षा
लालू प्रसाद यादव सध्या तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. शुक्रवारी झारखंड न्यायालयात चारा घोटाळा प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी लालूंच्या वकिलांनी न्यायालयाकडे सहा आठवड्यांचा अवधी मागितला. न्यायालयाने ही विनंती मान्य केली असून लालूंच्या जामिनावर पुढील सुनावणी आता सहा आठवड्यांनंतर होणार आहे.
चारा घोटाळ्यातील इतर प्रकरणांमध्ये लालू प्रसाद यादव यांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे. त्यामुळे दुमका कोषागार प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केल्यास लालू प्रसाद यादव तुरुंगाबाहेर येऊ शकतील.
मानसिक तणावामुळे प्रकृती बिघडली
यापूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतरही लालूंची प्रकृती खालावली होती. मधुमेहामुळे त्यांच्या शरीरातील क्रिएटिनिन लेव्हल वाढली होती.डॉक्टरांच्या मते, मानसिक तणाव वाढल्यामुळे लालू प्रसाद यादव यांची प्रकृती जास्त बिघडली. लालू यादव सतत निवडणुकीबाबत विचार करत असतात. निवडणुकीच्या विचारांमुळे ते खाण्या-पिण्याकडेही लक्ष देत नाही, असं डॉक्टरांनी सांगितले होते.
संबंधित बातम्या:
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर लालूंची प्रकृती बिघडली, मानसिक तणाव वाढला
(Lalu Prasad Yadav health condition Deteriorating)