हातावर सपासप वार, मनगट न तुटल्याने पुन्हा वार, लातूरमध्ये तुटलेलं मनगट घेऊन आरोपी पसार
लातूर जिल्ह्यात हिंस्रपणाची खळबळजनक घटना घडली आहे. जळकोट तालुक्यात एका आरोपीने तरुणाचा हात मनगटापासून तोडून, तो आपल्यासोबत घेऊन पळून गेला. चेरा या गावात ही थरारक घटना घडली.
लातूर : लातूर जिल्ह्यात हिंस्रपणाची खळबळजनक घटना घडली आहे. जळकोट तालुक्यात एका आरोपीने तरुणाचा हात मनगटापासून तोडून, तो आपल्यासोबत घेऊन पळून गेला. चेरा या गावात ही थरारक घटना घडली. चार दिवसापूर्वी घडलेल्या या घटनेची परिसरात एकच चर्चा सुरु आहे. जखमी व्यक्तीचा हात आणि आरोपी शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. (Latur jalkot crime)
प्रकाश माने असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर पिराजी पिकले या आरोपीने हा हल्ला केल्याचा आरोप आहे. चेरा पाटी गावाजवळच्या धाब्यावर जेवण करुन प्रकाश माने घराकडे जात होते. त्यावेळी मोटारसायकलवरुन आलेल्या पिराजी पिकलेने तीक्ष्ण हत्याराने प्रकाश मानेवर हल्ला केला. पिराजीने प्रकाशच्या हातावर सपासप वार केले. त्याने हात मनगटापासून कापून काढला.
हात सहजा सहजी तुटत नसल्याने आरोपीने प्रकाशच्या हातावर सपा-सप वार केले. त्यानंतर मनगटापासून तुटलेला हात घेऊन आरोपी पिराजी गाव सोडून पळून गेला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रकाशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावरील उपचारानंतर पोलिसांनी त्याच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. भर दिवसा घडलेल्या या घटनेला चार दिवस उलटले तरी पोलिसांना अद्याप ना आरोपी सापडला, ना मनगटापासून तुटलेला हात.