रायगडमध्ये लेप्टोसदृश्य आजाराने खळबळ, चौघांचा मृत्यू, संशयितांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले

| Updated on: Nov 19, 2020 | 5:03 PM

लेप्टोस्पायरोसिस (Leptospirosis) सदृश्य आजाराने चार जणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अलिबागसह पेण तालुक्यात या आजाराची लक्षणं असणारे रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.

रायगडमध्ये लेप्टोसदृश्य आजाराने खळबळ, चौघांचा मृत्यू, संशयितांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले
Follow us on

रायगड : लेप्टोस्पायरोसिस (Leptospirosis) सदृश्य आजाराने चार जणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अलिबागसह पेण तालुक्यात या आजाराची लक्षणं असणारे रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. दरम्यान, संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याची माहिती आहे. (leptospirosis disease suspected patient dies in Raigad)

कोरोनाला थोपवण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणांकडून कसोशीने प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अजूनही कोरोनाचा संसर्ग पूर्णत: आटोक्यात आलेला नाही. असे असताना रायगडमध्ये लेप्टो रोगाचे संशयित रुग्ण आढळले आहेत. अचानक आढळलेल्या या संशयित रुग्णांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग आणि पेण तालुक्यात हे संशयित रुग्‍ण आढळले आहेत. अलिबाग तालुक्‍यातील धोकावडे येथील लेप्‍टोच्या संशयित रुग्‍णाचा मुंबईतील लीलावती रूग्‍णालयात मृत्‍यू झाला. तर नागाव येथे तीन संशयित रुग्‍णांनी लेप्टोसदृश्य आजाराने आपला जीव गमवला आहे.

रक्ताचे नमुने चाचणीसाठी, तर नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

एकूण चार जणांचा लेप्टोसदृश्य आजाराने मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कामाला लागल्या आहेत. संशयितांच्‍या रक्‍ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्‍यात आले आहेत. या आजारासंदर्भात ग्रामीण भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्‍यावी असं आवाहन आरोग्‍य यंत्रणेव्‍दारे करण्‍यात आलं आहे. ताप येणे, दम लागणे, सांधेदुखी अशी लक्षणे या आजारात आढळतात. ही लक्षणं आढळल्यास त्‍याकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहनही आरोग्य यंत्रणेने केले आहे.

दरम्यान, अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात या आजाराची मोफत चाचणी केली जाते. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये; मात्र संशय किंवा लक्षणे आढळल्यास चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांनी केलं आहे. यावेळी लेप्टो आजारावर दिल्या जाणाऱ्या औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

लेप्टोस्पायरोसिस आजार काय आहे?

हा बॅक्टेरियापासून पसरणारा आजार आहे. श्वान, उंदीर यांच्या लघवीतून हा आजार पसरतो. डोकेदुखी, अंगदुखी, काविळ, उल्टी, अंगावर लाल पुरळ अशा स्वरुपाची लक्षणं या आजारामध्ये आढळतात. उंदीर, घाण पाण्यापासून दूर राहून या आजारापूसन स्वत:चा बचाव करता येऊ शकतो. आजार अंगावर काढल्यास रुग्णाचा मृत्यूही या रोगामध्ये होऊ शकतो.

संबंधित बातम्या :

मुंबईतील खासगी रुग्णालयांसह नर्सिंग होम कोरोनामुक्त, 70 रुग्णालयात पावसाळी आजारांवर उपचार

Leptospirosis | ‘लेप्टो’चा धोका! पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा

Leptospirosis | मुंबईत कोरोनानंतर आता लेप्टोचा धोका, नेमकी लक्षणं काय?

(leptospirosis disease suspected patient dies in Raigad)