आधी केला कॉंग्रेसचा प्रचार; रावण आणि सीता यांच्यानंतर आता रामही होणार भाजपचे खासदार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन केले. राम मंदिर उभारणीचा मुद्दा भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्याचा एक भाग आहे. तर, मोदी हे उत्तर प्रदेशमधील आपली पहिली जाहीर सभा ही मेरठमध्येच घेणार आहेत.
नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिर उभारण्यात आले. राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा रामायण मालिकेतील राम, सीता, लक्ष्मण, रावण या भूमिका साकारणारे कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. लोकसभा निवडणुकीआधी झालेल्या या कार्यक्रमामुळे देशात राममय वातावरण निर्माण झाले आहे. भाजपने याचा फायदा घेत रामाची भूमिका करणारे कलाकार अरुण गोविल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने गोविल यांना त्यांच्या जन्मगावातून मेरठमधून लोकसभा उमेदवार म्हणून नाव घोषित केले आहे. तीन वेळा जिंकून आलेले विद्यमान खासदार राजेंद्र अग्रवाल यांचे तिकीट कापून भाजपने अरुण गोविल यांना रिंगणात उतरवले आहे.
2009 पासून राजेंद्र अग्रवाल हे सतत मेरठ मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 2019 च्या निवडणुकीत अग्रवाल यांनी बसपाचे हाजी याकूब कुरेशी यांचा 4,729 मतांनी पराभव केला. तर, 2014 च्या निवडणुकीत त्यांनी 2 लाखांपेक्षा जास्त मतांनी बसपाच्याच मोहम्मद शाहिद अखलाक यांचा पराभव केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन केले. राम मंदिर उभारणीचा मुद्दा भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्याचा एक भाग आहे. तर, मोदी हे उत्तर प्रदेशमधील आपली पहिली जाहीर सभा ही मेरठमध्येच घेणार आहेत. त्यामुळे भाजपकडून गोविल यांची निवड हा योगायोग नाही असे मानले जाते.
रामायण मालिकेमध्ये अरुण गोविल यांनी ‘राम’ ही भूमिका केली होती. 1988 मध्ये अरुण गोविल यांनी कॉंग्रेसचे राजीव गांधी यांच्यासाठी प्रचार केला होता. त्यावेळी राजीव गांधी यांनी त्यांना काँग्रेसमध्ये सामील होऊन निवडणूक लढवण्याची ऑफरही दिली होती. मात्र, त्यांनी ती नाकारली होती. त्यानंतर 2021 मध्ये अरुण गोविल यांनी भाजपात प्रवेश केला.
भाजपने सीता आणि रावण यांनाही दिली होती उमेदवारी
प्रभू रामाची भूमिका करणारे अरुण गोविल हे राजीव गांधी यांचा प्रचार होते. त्याचवेळी भाजपने 1991 च्या लोकसभा निवडणुकीत रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी आणि सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांना उमेदवारी दिली होती. दीपिका चिखलिया यांनी वडोदरा येथून निवडणूक जिंकली होती. तर, लंकेश म्हणून प्रसिद्ध असलेले अरविंद त्रिवेदी यांनी साबरकांठा मतदारसंघातून पहिली निवडणूक जिंकली. 1996 च्या निवडणुकीत मात्र अरविंद त्रिवेदी यांना गुजरातचे माजी मुख्यमंत्री अमरसिंह चौधरी यांच्या पत्नी आणि काँग्रेस उमेदवार निशा चौधरी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.