BJP CANDIDATE : ‘अब की बार, 400 पार’, पक्ष बदललेल्या या नेत्यांची भाजपने उभी केली फौज
भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये काही बड्या नेत्यांचा नावांचाही समावेश आहे. भाजपने दक्षिणेकडील राज्यावर अधिक लक्ष केंद्रित केल्यामुळे या यादीत त्या त्या राज्यातील उमेदवारांचा मोठ्या संख्येने भरणा आहे. ज्यांनी निवडणुकीपूर्वी पक्ष बदलला आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक घोषित होण्यापूर्वी भाजपने ‘अब की बार, 400 पार’चा नारा देत प्रचारात आघाडी घेतली. भाजपला पराभूत करण्याच्या इराद्याने रणांगणात इंडिया आघाडी उतरली. पण, एकेक घटक पक्ष साथ सोडून निघाले. आघाडीला निवडणुकीत उमेदवार मिळेनासे झाले. तर इकडे भाजपने 195 उमेदवारांची यादी जाहीर करत निवडणुकीत रंग भरला. पण या यादीमध्ये पक्षात नव्याने दाखल झालेल्या नेत्यांची आहेत. 400 जागांचे लक्ष्य गाठण्यासाठी भाजपला बळकटी देण्यासाठी या नेत्यांची नावे जाहीर केली असली तरी यामुळे अनेक विद्यमान खासदार आणि नेत्यांची नाराजीही पक्षाला ओढवून घ्यावी लागली आहे. यूपीपासून तेलंगणापर्यंत भाजपने पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना संधी दिली. यामध्ये 2 डझनहून अधिक नेते आहेत ज्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पक्ष बदलला आहे किंवा 2024 ची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजप आधीच मजबूत स्थितीत आहे. परंतु, येथेही काही पक्ष बदलणाऱ्या उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. बांसवाडा येथून भाजपने काँग्रेसचे माजी नेते महेंद्रजीत सिंग मालवीय यांना पक्षाने तिकीट दिले आहे. तर, उत्तर प्रदेशातील वरुण गांधी यांच्या जागी पिलीभीतमधून तिकीट मिळालेले जितिन प्रसाद यांनीही 2021 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आंबेडकर नगरचे आमदार रितेश पांडे 2019 मध्ये बसपाच्या तिकिटावर विजयी झाले होते. आता ते भाजपचे उमेदवार आहेत.
महाराष्ट्रातील काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार कृपाशंकर सिंह यांना जौनपूरमधून उमेदवारी दिली आहे. मध्य प्रदेशमध्येही काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले ज्योतिरादित्य सिंधिया हे गुनामधून उमेदवार आहेत. केरळमधील काँग्रेस नेते एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटोनी हे पठाणथिट्टा येथून भाजपचे उमेदवार आहेत. छत्तीसगडमधील सुरगुजामधून काँग्रेसचे माजी खासदार चिंतामणी महाराज यांना तिकीट देण्यात आले आहे.
भाजपने अनेक नव्या चेहऱ्यांचा पक्षात समावेश करून त्यांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हे सर्वात मोठे नाव आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. रामायण मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल हे मेरठमधून भाजपचे उमेदवार आहेत. राजस्थानच्या चुरू मतदारसंघातून भाजपने पॅरालिम्पिक खेळाडू आणि विश्वविजेता देवेंद्र झाझरिया यांना तिकीट दिले आहे.
दक्षिण भारतीय पक्षांतर करणारे बरेच
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला तेलंगणामध्ये यश मिळाले नाही. या राज्यात कॉंग्रेसने सत्ता खेचून आणली. मात्र, तेलंगणात भाजपने आदिलाबादमधून गोदाम नागेश, महबूबाबादमधून ए. सीताराम नाईक, नालगोंडामधून सईदा रेड्डी, जहीराबादमधून बीबी पाटील, नगरकुर्नूलमधून पी भरत, वारंगलमधून अरोरी रमेश यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे हे सर्व नेते माजी मुख्यमंत्री सी. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
त्याचप्रमाणे टीआरएसमधून भाजपमध्ये दाखल झालेले डीके अरुण यांना महबूबनगरमधून, इटेला राजेंद्र यांना मलकाजगिरीतून आणि बुरा एन गौर यांना भोंगीरमधून तिकीट मिळाले आहे. तर, पेडापल्ले येथील भाजपचे उमेदवार गोमासा श्रीनिवास आणि चेल्वेल्ला येथील भाजपचे उमेदवार विश्वेश्वर रेड्डी यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
आंध्र प्रदेशात या नव्या चेहऱ्यांना तिकीट
आंध्र प्रदेश राज्यात भाजपने राजमपेठमधून काँग्रेसचे माजी खासदार किरणकुमार रेड्डी यांना तिकीट दिले आहे. वायएसआर काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कोठापल्ली गीता या अरकू मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आहेत. टीडीपीमधून भाजपमध्ये दाखल झालेले सीएम रमेश यांना अनकापल्ले येथून तिकीट मिळाले आहे. तिरुपती येथून भाजप उमेदवार वारा प्रसाद राव यापूर्वी वायएसआर काँग्रेसमध्ये होते.
हरियाणातही पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना उमेदवारी
हरियाणात काँग्रेसचे माजी खासदार नवीन जिंदाल यांना कुरुक्षेत्रातून तिकीट मिळाले आहे. सिरसा येथून उमेदवारी दिलेले अशोक तंवर हे तर हरियाणा काँग्रेसचे अध्यक्ष होते. हिसारमधून रणजित सिंह चौटाला यांना उमेदवारी दिली आहे. ज्यांनी तिकीट मिळण्याच्या काही तास आधी पक्षात प्रवेश केला होता. झारखंडमध्ये झामुमोमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सीता सोरेन यांना दुमकामधून आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गीता यांना सिंगभूममधून तिकीट दिले आहे.