EXPLAINER : दीदी मायावती आहेत तरी कुठे? बसपाच्या हत्तीची चाल लोकसभा निवडणुकीत दिसणार की नाही?
होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत बसपाची काहीच हालचाल दिसत नाही. एके काळी डौलाने चालणाऱ्या बसपाच्या हत्तीची चाल आता डगमगीत झालीय का? लोकसभेच्या तयारीला सर्व पक्ष लागले असताना या सर्व गेममधून BSP मात्र गायब झाल्यासारखे चित्र आहे.
नवी दिल्ली | 9 मार्च 2024 : उत्तर प्रदेशच नव्हे तर देशाच्या राजकारणात दीदी मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचे दलित मतांवर प्राबल्य होते. बहुजन समाजाच्या हक्काचा आवाज बुलंद करण्याच्या उद्देशाने बसपाची स्थापना करण्यात आली. मायावती यांचे खंबीर नेतृत्व या पक्षाला लाभले. राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याला मान्यताही मिळाली. पण, आता होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत बसपाची काहीच हालचाल दिसत नाही. एके काळी डौलाने चालणाऱ्या बसपाच्या हत्तीची चाल आता डगमगीत झालीय का? लोकसभेच्या तयारीला सर्व पक्ष लागले असताना या सर्व गेममधून BSP मात्र गायब झाल्यासारखे चित्र आहे. काय आहे नेमका दीदी मायावती यांची खेळी?
उत्तर प्रदेशमध्ये 2022 मध्ये विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत बसपाने एकूण 403 जागा लढविल्या. 2007 मध्ये मायावती यांनी दलित मतांच्या बळावर राज्यात एकहाती सत्ता आणली होती. मात्र, त्यांचा हा करिष्मा पुढे चालला नाही. मतांची टक्केवारी कमी झाली. निवडून येणाऱ्या जागांचेही प्रमाण घटले. त्यामुळे की काय 2022 च्या निवडणुकीत बसपाला 403 पैकी केवळ एकच जागा जिंकता आली.
2022 च्या त्या निवडणुकीत आलेल्या प्रचंड अपयशामुळे बसपावर मरगळ पसरली. मायावती यांना हा प्रचंड मोठा धक्का होता. या घटनेला दोन वर्ष झाली. दरम्यानच्या काळात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. यातील राजस्थान आणि मध्य प्रदेशात बसपाने चांगली कामगिरी केली. राजस्थानमध्ये 1.82% मतांसह 2 जागा जिंकल्या तर मध्य प्रदेशमध्ये पक्षाला 3.38% मते मिळाली. विशेष म्हणजे मायावती यांनी दोन्ही राज्यात प्रचार न करताही पक्षाला ही मते मिळाली होती. मात्र, असे असतानाही 2024 च्या राजकीय समीकरणात बसपा दिसत नाही.
लोकसभा निवडणुकीसाठी देशात, राज्यातील विविध पक्ष युती, आघाडी करत आहेत. मात्र, दीदी मायावती यांच्या बसपाने अद्याप कोणत्याही पक्षासोबत युती किंवा आघाडी केलेली नाही. मायावती यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्याच पक्षाचे नेते संभ्रमात सापडले आहेत. यामुळे बसपा आपल्या दलित मतांवरच अवलंबून असल्याचे दिसत आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये बसपाने 80 जागा लढविल्या. त्यापैकी 10 जागा जिंकल्या. पण, त्यावेळी बसपा आणि सपा यांच्यामध्ये युती झाली होती आणि बसपाच्या विजयामागचे हे एक प्रमुख कारण होते. बीएसपीच्या मतांची टक्केवारी 2019 मध्ये सुमारे 22 टक्के इतकी होती. मात्र, यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकांबाबत बसपाची भूमिका खूपच नकारात्मक दिसत आहे.
बसपाची अधोगती होतेय?
90 च्या दशकामध्ये बसपा हा देशातील एक मोठा पक्ष मानला जात होता. 1993 ते 2022 या काळात महत्वाची राजकीय स्थित्यत्यरे झाली त्यात बसपाची भूमिका महत्वाची होती. 2007 च्या विधानसभा निवडणुकीत बसपाची उत्तरप्रदेश राज्यात सत्ता आली आणि मायावती या मुख्यमंत्री झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत बसपाची अधोगतीच पहायला मिळाली. 2022 च्या निवडणुकीत तर मायावती यांच्या पक्षाने मुस्लिम मतेही गमावली.
काँग्रेसचा प्रयत्न फसला
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने बसपासोबत युती करण्याचा प्रयत्न केला. भारत आघाडीमध्ये बसपाला सामील करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मायावती यांनी या प्रयत्नाला धक्का देत युती करण्यास नकार दिला. युपीमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसची युती आहे. सपाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपनेही आपल्या 52 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, मायावती यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केली नाही. ना उमेदवार जाहीर केलेत. त्यामुळे मायावती तिकीट वाटपाची प्रक्रिया कधी सुरू करणार याची प्रतीक्षा पक्षाचे नेते करत आहेत.
मायावती भाजपसोबत जाणार का?
कॉंग्रेससोबत युतीला नकार दिल्यामुळे मायावती भाजपसोबत जाणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. याचे कारण म्हणजे राज्यसभा निवडणुकीत बसपाने भाजप उमेदवाराला मतदान करण्याचे जाहीर केले होते. त्याचप्रमाणे महिला आरक्षण विधेयकाला बसपाने केंद्रातील मोदी सरकारला पाठींबा दिला होता. विधानसभेतील बसपाच्या सर्व आमदारांनी नुकतेच रामललाचे दर्शन घेतले. तर, अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बसपाने भाजप उमेदवारांना पाठिंबा दिला होता.
अन्य पक्षात नेते निघाले
दीदी मायावती यांची भाजपसोबत जवळीक वाढल्याची चिन्हे दिसताच अनेक नेत्यांना पक्षाला राम राम केला. पक्षाच्या मुस्लिम नेत्यांना अशी भीती वाटते की पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली तरी त्यांच्या विजयाची शक्यता कमी आहे. दलित आणि मुस्लिम हे बसपा भाजपसोबत असल्याचा मुद्दा उपस्थित करतात. त्यामुळे आम्हाला इतर पक्षांमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही. त्याचप्रमाणे बसपाने स्वतंत्रपणे निवडणूक लढविल्याने विरोधी पक्षांचे नुकसान होईल आणि भाजपचा मार्ग सुकर होईल, असेही हे नेते सांगत आहेत.