मला देवाने न्याय दिला, कोर्टाने अर्ज स्वीकारल्यानंतर मल्ल्याचं ट्वीट
भारतीय बँकाना 9 हजार कोटी रुपयाचा चुना लावून फरार असलेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला लंडन कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
नवी दिल्ली : भारतीय बँकाना 9 हजार कोटी रुपयाचा चुना लावून फरार असलेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला लंडन कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मल्ल्याने भारताकडे प्रत्यर्पण होण्याविरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका कोर्टाने स्वीकारली आहे. यानंतर मल्ल्याने मला देवाने न्याय दिल्याचे मत व्यक्त केले.
मल्ल्या म्हणाला, “देव महान आहे. न्यायाचा विजय झाला. सीबीआयने केलेल्या आरोपांप्रकरणी देण्यात आलेल्या निर्णयाविरुद्ध अपिल करण्याची परवानगी विभागीय न्यायालयाने दिली आहे. हे आरोप खोटे असल्याचे मी नेहमीच म्हटले आहे.”
God is great.Justice prevails. A Division Bench of the English High Court with two senior Judges allowed my application to appeal against the Magistrates Judgement on the prima facie case and charges by the CBI. I always said the charges were false.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) July 2, 2019
लंडन कोर्टाने आज (2 जुलै) मल्ल्याचे भारताला प्रत्यर्पण करण्याबाबत सुनावणी घेतली. यावेळी विजय मल्ल्याच्या वकीलांनी युक्तीवाद केला. मल्ल्याचे वकील म्हणाले, “हे प्रकरण भारतात सुरु झाले. संबंधित बँकांना माल्याच्या एअरलाईनची पूर्ण माहिती होती. एअरलाईनच्या कर्जांची कोणतीही गॅरंटी नाही हेही बँकांना माहिती होते. बँकांना माल्याच्या आर्थिक स्थितीची पूर्ण माहिती होती. जे कागदपत्रे उपलब्ध आहेत त्यात याविषयी कोणताही पुरावा नाही.”
Vijay Mallya’s permission to appeal against the extradition case has been approved by the Royal Courts of Justice,London. Details awaited. pic.twitter.com/5wzU0KzVpK
— ANI (@ANI) July 2, 2019
मल्ल्याच्यावतीने सादर करण्यात आलेली कागदपत्रे योग्य पद्धतीने पाहिले गेले नाही, असाही युक्तीवाद मल्ल्याच्या वकीलांनी केला. सुनावणीच्या आधी मल्ल्याने पैसे परत करण्यात मला कोणतीही सवलत नको. 100 टक्के पैसे परत घ्या, अशी विनंती भारत सरकारला केली होती.
विजय मल्ल्याला भारतात परत आणण्यासाठी भारतातील अनेक तपास संस्था प्रयत्न करत आहेत. लंडनच्या कोर्टाने विजय मल्ल्याला एका आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणात भारतात प्रत्यर्पित करण्याचा आदेश दिला होता. याच आदेशाविरुद्ध मल्ल्याने याचिका दाखल करत प्रत्यर्पण होण्यास विरोध केला होता.