ज्योतिरादित्य शिंदेंच्या राजीनाम्यानंतर आता मध्यप्रदेशात पुढे काय?
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर 21 काँग्रेस आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला (Madhya Pradesh Congress Politics). त्यामुळे आता मध्यप्रदेशमध्ये पुढे काय होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
भोपाळ : काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर नाराज ज्योतिरादित्य शिंदे यांनी अखेर काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला (Madhya Pradesh Congress Politics). स्वतः ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विट करत आपल्या राजीनामच्याची माहिती दिली. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर मध्यप्रदेश काँग्रेसमध्ये मोठी फूट पाहायला मिळाली. शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर केवळ 25 मिनिटांमध्ये 19 काँग्रेस आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. यामुळे आता मध्यप्रदेशमध्ये पुढे काय होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर सुरुवातीला शिंदे समर्थक 19 काँग्रेस आमदारांनी आपल्या हाताने लिहिलेला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला. त्यानंतर दुपारी आणखी एक काँग्रेस आमदार बिसाहूलाल सिंह यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकला. बिसाहूलाल यांनी भाजप नेते शिवराज सिंह यांच्यासोबत पत्रकार परिषदही घेतली. बिसाहूलाल म्हणाले, ‘आगामी काळात बहुतेक काँग्रेस आमदार भाजपमध्ये सहभागी होतील.’
काँग्रेसला बसलेल्या या झटक्यानंतर शिवराज सिंह यांनी आणखी एक काँग्रेस आमदार एंदल सिंह कंसाना यांनी राजीनामा दिल्याची माहिती दिली. तसेच कंसाना भाजपमध्ये येणार असल्याचंही नमूद केलं. यानंतर 3.45 वाजता कंसाना यांच्याही राजीनाम्याची माहिती समोर आली. आत्तापर्यंत काँग्रसेच्या एकूण 21 आमदारांनी राजीनामा दिला आहे.
मध्यप्रदेश विधानसभेतील संख्याबळाचं गणित काय?
पक्षनिहाय संख्याबळ (228)
एकूण आमदार = 230 रिक्त जागा = 02
काँग्रेस – 114 भाजप – 107 बसप – 02 सपा – 01 अपक्ष – 04
राजीनाम्यानंतर संख्याबळ
काँग्रेस = 93 (114 – 21 राजीनामा दिलेले आमदार)
काँग्रेस + मित्रपक्ष = 100
भाजप = 107
बहुमताचा आकडा = 107
दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्लीत काही मिनिटेच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देणं टाळलं. ते म्हणाले, ‘मला जे म्हणायचं होतं ते मी माझ्या राजीनाम्यात म्हटलं आहे. हॅपी होळी.’ यानंतर तात्काळ ते निघून गेले.
मध्यप्रदेशमधील कमलनाथ सरकार अल्पमतात
आतापर्यंत काँग्रेसच्या एकूण 21 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे कमलनाथ सरकार संकटात आले आहे. या आमदारांचे राजीनामे मंजूर झाल्यानंतर काँग्रेसकडे केवळ 100 आमदार शिल्लक आहेत. यात विधानसभा अध्यक्षांचाही समावेश आहे. सध्या कमलनाथ सरकारला 4 अपक्ष आमदारांसह समाजवादी पक्षाचे एक आणि बहुजन समाज पक्षाचे (बसप) 2 आमदारांचा पाठिंबा आहे. हे सर्व मिळून मुख्यमंत्री कमलनाथ यांना सध्या 107 आमदारांचा पाठिंबा आहे. भाजपकडे देखील 107 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे आगामी मध्यप्रदेश विधानसभा अधिवेशनात भाजप अविश्वास प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमलनाथ यांच्यासमोर सरकार वाचवण्याचं मोठं आव्हान आहे.
बंडखोर काँग्रेस आमदार मध्यप्रदेशबाहेर वेगवेगळ्या ठिकाणी
ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक बंडखोर काँग्रेस आमदार मध्यप्रदेशच्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी थांबले आहेत. बंगळुरुपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या रिसॉर्ट पाम मेडोज येथे अनेक आमदारांची व्यवस्था करण्यात आली आहे. हे ठिकाणी कर्नाटक भाजपचे आमदार अरविंद लिंबोवली यांच्या मतदारसंघातील आहे. या ठिकाणी आमदारांच्या सुरक्षेसाठी कमांडो तैनात करण्यात आले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा मुलगा आणि खासदार राहिलेल्या बी. वाय. राघवेंद्र आणि विजयन यांच्याकडे मध्यप्रदेशच्या या बंडखोर आमदारांची जबाबदारी देण्यात आली आहे.
काँग्रेसच्या रणनीती काय असणार?
काँग्रेसकडे कमलनाथ सरकार वाचवण्याचे आता केवळ दोन पर्याय शिल्लक असल्याचं मत राजकीय विश्लेषक सांगत आहेत. 1. काँग्रेस आमदारांच्या बैठकीसाठी व्हिप काढणे. याचं उल्लंघन करणाऱ्यांना विधानसभेत येण्यापासून रोखणे. यात विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. 2. काँग्रेसने राज्यसभेच्या निवडणुकीपर्यंत थांबणे. यासाठी अजून 16 दिवस बाकी आहेत. मात्र, सरकारचा निर्णय आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनातच होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक झाली असून यात ज्योतिरादित्य यांना राज्यसभेचं तिकिट देऊन तुळसीराम सिलावट यांना मध्यप्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद देण्यावर चर्चा झाली.
संबंधित बातम्या:
नऊ वेळा खासदार, विमान अपघातात मृत्यू, ज्योतिरादित्यांचे पिता माधवराव शिंदेंची कहाणी
आधी मोदी सरकारवर घणाघात, नंतर मोदी-शाहांची भेट, 14 दिवसात ज्योतिरादित्य शिंदेंचा यूटर्न
Madhya Pradesh Congress Politics