वाजपेयींचे निकटवर्तीय नेते, मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन
लालजी टंडन हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे खंदे समर्थक मानले जात असत. वाजपेयी यांनी 1991 पासून सलग चार वेळा राखलेल्या लखनौ मतदारसंघात लालजी टंडन विजयी झाले होते.
भोपाळ : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन झाले आहे. प्रकृती खालावल्याने गेले काही दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Madhya Pradesh Governor Lalji Tandon Dies at the age of 85)
लालजी टंडन हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे खंदे समर्थक मानले जात असत. 1978–84 या कालावधीत ते उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे सदस्य होते. तर 1996 ते 2009 दरम्यान सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले. बसप-भाजप युती सरकारमध्ये मायावतींच्या नेतृत्वात त्यांनी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळात नगरविकास मंत्री म्हणूनही काम पाहिले होते.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
लालजी टंडन यांनी 2009 मध्ये लखनौ मतदारसंघातून काँग्रेस नेत्या रिता बहुगुणा जोशी यांचा 40 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता. ही जागा अटल बिहारी वाजपेयी यांनी 1991 पासून सलग चार वेळा राखली होती. लालजी टंडन यांनी बिहारचे राज्यपालपदही भूषवले आहे.
लालजी टंडन यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवल्याची माहिती लखनऊमधील मेदांता रुग्णालयाच्या संचालकांनी दिली होती. लालजी टंडन यांचे पुत्र आशुतोष टंडन यांनी सकाळी 7 वाजता ‘बाबूजी नहीं रहे’ असे ट्वीट करत लालजींच्या निधनाची दु:खद वार्ता दिली.
बाबूजी नहीं रहे
— Ashutosh Tandon (@GopalJi_Tandon) July 21, 2020
टंडन 10 दिवसांच्या सुट्टीवर लखनऊ येथील आपल्या घरी गेले होते, तिथे त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. श्वासोच्छवास करताना त्रास होत असल्याने आणि ताप वाढल्याने लालजी टंडन यांना 11 तारखेला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 13 जुलैला त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.
लालजी टंडन यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळेच उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना मध्य प्रदेशचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. (Madhya Pradesh Governor Lalji Tandon Dies at the age of 85)