दिल्लीत शेतकरी आंदोलनाचा ७वा दिवस, राज्यात काँग्रेस आक्रमक!, गुरुवारी प्रत्येक तालुक्यात आंदोलन छेडणार
शेतकरी आंदोलनाला समर्थन आणि कृषी कायद्याला विरोध दर्शनवण्यासाठी उद्या राज्यातील प्रत्येक तालुक्यात आंदोलन करण्याचे आदेश महसूलमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिले आहेत.
मुंबई: राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 7 दिवसांपासून हजारो शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. मंगळवारी केंद्र सरकारचे काही मंत्री आणि शेतकरी संघटनांमध्ये बैठक पार पडली. पण त्यातून तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता महाराष्ट्र काँग्रेसनं पाठींबा दिला आहे. त्यासाठी उद्या राज्यातील प्रत्येक तालुक्यात आंदोलन करण्यात येणार आहे. तशी घोषणा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलीय. (Maharashtra Congress statewide agitation tomorrow)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून एक पत्रक काढण्यात आलं आहे. त्यात दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा दर्शवण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनाला समर्थन आणि कृषी कायद्याला विरोध दर्शनवण्यासाठी उद्या राज्यातील प्रत्येक तालुक्यात आंदोलन करण्याचे आदेश महसूलमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक ब्लॉक मुख्यालयात हे आंदोलन करण्यात येणार आहे.
दरम्यान, मंगळवारी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, अकोला अशा अनेक शहरांत जोरदार आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला. येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यात आला नाही तर एकाही केंद्रीय मंत्र्याला फिरु देणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. तसंच राज्यात दिल्लीपेक्षाही उग्र आंदोलन पुकारलं जाईल, असंही शेट्टी म्हणाले.
केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील बैठक निष्फळ
केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील कालची (1 डिसेंबर) बैठक निष्फळ ठरली आहे. दिल्लीच्या विज्ञान भवन येथे पंजाबच्या शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ आणि केंद्र सरकार यांच्यात जवळपास तीन तास चर्चा झाली. मात्र, या बैठकीत काहीच निष्पन्न न झाल्याने शेतकऱ्यांनी हे आंदोलन जारी ठेवण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना गुरुवारी (3 डिसेंबर) पुन्हा बैठकीचे निमंत्रण देण्यात आलं आहे. पुढील बैठक गुरुवारी दुपारी बारा वाजता होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
3 डिसेंबरला राज्यव्यापी आंदोलन
दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेलं शेतकऱ्यांचं हे देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीही घेतला आहे. महाराष्ट्रातही 3 डिसेंबर रोजी उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. “भाजपचे केंद्र सरकार दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन बळाच्या जोरावर दडपून टाकू पाहत आहे. शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करून, अश्रूधूर सोडून, हायवेवर खड्डे खणून, शेतकरी नेत्यांना स्थानबद्ध करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारच्या या दडपशाहीला न जुमानता लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देऊन गेले चार दिवस बसले आहेत. हे आंदोलन देशातील सर्व राज्यांमध्ये आणखी तीव्र करणार”, असा इशारा अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने दिला आहे.
संबंधित बातम्या:
केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील बैठक निष्फळ; आंदोलन सुरुच ठेवण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार
Maharashtra Congress statewide agitation tomorrow