Chandrakant Patil कोल्हापूर : सत्ताधारी भाजप नेत्यांना झालंय तरी काय, असा प्रश्न पडावा इतका बेफिकीरपणा नेते आणि मंत्री करत आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कोल्हापूरमध्ये पोहोचण्यास केलेला विलंब असो, प्रश्न विचारणाऱ्या टीव्ही 9 च्या अँकरला मंत्रिपदाची ऑफर असो, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा सेल्फी असो किंवा मग फूड पाकिटांवरील सत्ताधाऱ्यांचे फोटो असो, सत्ताधारी मंडळी पूरग्रस्तांचा रोष पत्करुन घेत आहेत.
या सर्व घटना ताज्या असताना, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे पूरग्रस्तांशी संवाद साधत असताना, पूरग्रस्तांनी त्यांच्याकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांचा संयम सुटला आणि त्यांनीही तक्रार करणाऱ्या पूरग्रस्तांना झापण्यास सुरुवात केली.
‘तुम्ही तक्रारी करु नका, सूचना करा. तक्रारी करुन काही होणार नाही, ए गप्प’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पुरात बुडालेल्या पुलाची शिरोली या गावात हा प्रकार घडला.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
पुलाची शिरोली इथं पाणी भरल्याने अनेकांचं स्थलांतर केलं आहे. स्थलांतर केलेल्या एका शिबिरात चंद्रकांत पाटील पोहोचले. त्यावेळी ते नागरिकांना घाबरु नका, सरकार पाठिशी आहे, असं सांगत होते.
“शिरोलीमधून रोड सुरु झाला, तर आपल्याला जे हवं ते आणता येईल. म्हणून मी आपल्याला पार्थना करेन की विचलित न होता, न घाबरता सरकार पाठिशी आहे याची खात्री बाळगा. हे सर्व आपण नीट करु. तक्रारी करुन काही होणार नाही, सूचना करा. प्रशासनाला तक्रारी करुन काय होणार”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील बोलत असताना खालून एक व्यक्ती तक्रारीच्या सुरात आपलं म्हणणं मांडत होता. त्यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, सगळं करु, सगळं करु…. त्यावेळी पुन्हा ती व्यक्त बोलू लागल्याने चंद्रकांत पाटलांचा संयम सुटला आणि ते ओरडले ये… गप्प.
‘तक्रारी करुन काही होणार नाही, ए गप्प’, चंद्रकांत पाटलांनी पूरग्रस्ताला झापलं, भाजप नेत्यांच्या उर्मटपणावर पूरग्रस्तांचा संताप https://t.co/FKq9mquJUP @rahul_zori #ChandrakantPatil pic.twitter.com/EQA3jhZs9Z
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 12, 2019
महापुराने जनता हैराण
कोल्हापूर आणि सांगलीतील नागरिक पुराने हैराण आहेत. दोन्ही जिल्ह्यांना आठवडाभरापासून पुराने वेढा दिला आहे. अनेकांनी आपले नातेवाईक गमावले आहेत, गुरं-ढोरं पाण्यात वाहून गेली आहेत. घरं बुडाल्याने संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत हतबल झालेल्या जनतेला सत्ताधाऱ्यांनी धीर देणं आवश्यक आहे. सर्व गमावलेले नागरिकांमध्ये संताप, क्रोध या भावना असणं साहजिक आहे. पण म्हणून पूरग्रस्तांनी राग व्यक्त केला, म्हणून त्यांना जशास तसं उत्तर देणं हे सत्ताधाऱ्यांना शोभणारे नाही.
संबंधित बातम्या
…म्हणून चंद्रकांत पाटील यांची टीव्ही 9 च्या अँकरला मंत्रीपदाची ऑफर
सांगली : गिरीश महाजनांना ‘सेल्फी’ भोवला, पूरग्रस्तांचा राग अनावर
कोल्हापूर : गिरीश महाजनांच्या सेल्फीवर मुख्यमंत्र्यांची पाठराखण
सांगली : गिरीश महाजनांवर पूरग्रस्त संतापले, सरकारी हलगर्जीपणाचे वाभाडे काढले