कोल्हापूर-सांगलीचे 34 जण इराणमध्ये अडकले, औषधं संपली, वृद्ध पर्यटकांच्या कुटुंबांची घालमेल
कोल्हापूर, सांगलीसह पलूस भागातील 34 पर्यटक आपल्या धार्मिक गुरुंसोबत इराक-इराणला धार्मिक पर्यटनासाठी गेले आहेत Maharashtra Tourists stuck in Tehran
कोल्हापूर : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतातून इराण-इराककडे जाणारी विमानसेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी धार्मिक पर्यटनासाठी गेलेले कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील 34 पर्यटक तेहरानमध्ये अडकून पडले आहेत. यातील बहुतांश पर्यटक वयोवृद्ध असल्यामुळे त्यांच्या कोल्हापूरमधील नातेवाईकांची चिंता वाढली आहे. एका बाजूला कोरोनाची भीती आणि दुसऱ्या बाजूला औषधे संपत आल्याने या वृद्ध पर्यटकांचा धीर सुटत चालला आहे. सर्वांना लवकरात लवकर मायदेशात आणण्याची गरज व्यक्त होत आहे. (Maharashtra Tourists stuck in Tehran )
कोल्हापूर, सांगलीसह पलूस भागातील 34 पर्यटक आपल्या धार्मिक गुरुंसोबत इराक-इराणला धार्मिक पर्यटनासाठी गेले आहेत. मुंबई मधील ‘साद टुरिस्ट कंपनी’च्या माध्यमातून 21 फेब्रुवारीला हे सर्व जण मुंबईहून रवाना झाले. 21 फेब्रुवारी ते 7 मार्चपर्यंत त्यांचा कार्यक्रम नियोजित होता. मात्र इराकमध्ये कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इराणकडून इराककडे जाणारी विमान वाहतूक 24 फेब्रुवारीला बंद झाली.
पर्यटनासाठी गेलेले वयोवृद्ध पर्यटक इराणमधील तेहरान शहरातच अडकून पडले आहेत. त्यातच भारत सरकारनेही इराण-इराककडे जाणारी विमान वाहतूक थांबल्याने या पर्यटकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
नियोजित दौऱ्यानुसार आज म्हणजे तीन मार्चला हे सर्व पर्यटक तिथून निघणार होते. मात्र त्याआधीच विमानसेवा रद्द झाल्याने टुरिस्ट कंपनीने या सर्वांची जादाची राहण्याची सोय केली आहे. सध्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था असली, तरी यातील बहुतांश व्यक्ती वृद्ध आहेत. अनेकांना मधुमेह, हृदयविकारासारखे आजार आहेत. या सर्वांची औषधं आता संपत आली आहेत. भारताप्रमाणे इराणमध्ये औषध मिळत नसल्याने पर्यटकांसोबतच महाराष्ट्रातील त्यांच्या नातेवाईकांची चिंताही वाढली आहे.
विमानसेवा रद्द झाल्याने गेल्या चार दिवसांपासून पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत. व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून त्यांचा संवाद सुरु असून याद्वारे एकमेकांना धीर देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. आज विमानसेवा सुरु होईल, अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र त्यांच्या पदरी निराशा पडली आहे.
Representatives of 44 pilgrims from #Maharashtra (Sangli, Kolhapur and Akluj) met with senior #Embassy officers today. All are in good health and were assured all assistance. pic.twitter.com/3wv2K1Tv81
— India in Iran (@India_in_Iran) March 3, 2020
कोल्हापूर-सांगलीचे पर्यटक असलेल्या तेहरान शहरातील परिस्थिती सामान्य असली, तरी कोरोनाची भीती आणि नेहमीची औषधं संपत आल्याची धास्ती या पर्यटकांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसत आहे. (Maharashtra Tourists stuck in Tehran )