School Reopen | महाराष्ट्रातील शाळा पुन्हा उघडण्याचा मुहूर्त ठरला
नववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर उघडणार असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
अमरावती : महाराष्ट्रातील शाळा पुन्हा उघडण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. नववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर उघडणार आहेत. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात माहिती दिली. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळा उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. (Maharashtra Schools to reopen after Diwali Education MOS Bacchu Kadu announces)
कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागल्यानंतर राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयं बंद होती. काही महिन्यांपूर्वी ऑनलाईन शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. मात्र आता नोव्हेंबर महिन्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याची तयारी राज्य शासन करत आहे, असे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.
नववी ते बारावीचे विद्यार्थी वयाने थोडे मोठे असतात, त्यामुळे हे पहिले पाऊल आपण उचलत आहोत. सर्व माहिती घेऊनच आपण शाळा सुरु करु, अधिवेशनात जशा आमदारांच्या तपासण्या केल्या गेल्या, तशा विद्यार्थ्यांच्या करता येतील का, याबाबत चाचपणी सुरु आहे. बाधित शिक्षक शाळेत जाणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल. धोरण ठरवून नोव्हेंबरपासून शाळा सुरु करु, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
खबरदारी काय काय?
शाळा सुरु करताना शाळेमध्ये पूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे. प्रत्येकाची तपासणी करण्यात येईल. पूर्ण शाळा निर्जंतुक करण्यात येईल आणि पूर्ण खबरदारी घेऊनच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्राची मार्गदर्शक तत्त्वे कोणती?
शाळा सुरु करताना विद्यार्थ्यांना एकमेकांपासून कमीत कमी सहा फुटांचं अंतर ठेवावं लागणार आहे. तसेच मास्कची सक्ती, सतत हात धुणे, थुंकण्यास मनाई, आरोग्य सेतू अॅप अनिवार्य आहे, असे केंद्र सरकारने सांगितले आहे. कंटेन्मेंट झोनमधील शाळा उघडण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.
शाळांना जास्तीत जास्त 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलावण्याची परवानगी आहे. क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरलेल्या शाळा अधिक काळजीपूर्वक स्वच्छ करण्यास सांगितले आहे.
केंद्र सरकारने 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष उघडण्याची मुभा दिली होती, मात्र राज्यातील संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास नकार दिल्याने दिवाळीनंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता इतक्यात शाळा उघडणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका संस्थाचालकांनी ऑनलाईन बैठकीत घेतली होती. (Maharashtra Schools to reopen after Diwali Education MOS Bacchu Kadu announces)
VIDEO | Washim | ऑनलाईन शिक्षणाचं आव्हान, नेटवर्कसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी छतावर | वाशिम – TV9 pic.twitter.com/tPWsvwYkTa
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 4, 2020
संबंधित बातम्या :
महाराष्ट्रात शाळा दिवाळीनंतरच, शालेय शिक्षण मंत्र्यांचा विद्यार्थी-पालकांना दिलासा
नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची मुभा मिळणार, अटी काय?
(Maharashtra Schools to reopen after Diwali Education MOS Bacchu Kadu announces)