विधानसभेपूर्वी युवक काँग्रेसचं ‘वेकअप महाराष्ट्र’ अभियान
आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने महाराष्ट्रातील युवकांसाठी स्वतंत्र युवक जाहीरनामा तयार करण्याचं ठरविलं आहे. याच्या माध्यमातून युवक काँग्रेस महाराष्ट्रातील युवा वर्ग म्हणजेच 18 ते 30 वयोगटातील तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे.
मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने महाराष्ट्रातील युवकांसाठी स्वतंत्र युवक जाहीरनामा तयार करण्याचं ठरविलं आहे. याच्या माध्यमातून युवक काँग्रेस महाराष्ट्रातील युवा वर्ग म्हणजेच 18 ते 30 वयोगटातील तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्यातील युवकांशी प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन संपर्क साधून त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कसा आहे, त्यांची मतं जाणून घेतली जाणार आहेत. त्यासाठी युवक काँग्रेसने ‘वेकअप महाराष्ट्र… उद्यासाठी आत्ता’ या अभियानाची सुरुवात केली आहे.
एकीकडे 2020 मध्ये भारत महासत्ता होण्याची स्वप्नं दाखविली जात असताना; दुसरीकडे मात्र देशात सध्या लोकशाहीविरोधी वातावरण तयार झालं आहे. भारताची परिस्थिती पुन्हा पारतंत्र्याच्या दिशेने सुरु आहे. भारत हा युवकांचा देश आहे, तरीही देशातील कोट्यावधी युवक नोकरी नसल्यामुळे बेरोजगार आहेत, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भाजपा सरकारच्या काळात बेरोजगारीचा दर सर्वोच्च स्थानी पोहचला आहे. दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देऊ, असं म्हणणारी भाजप सरकार युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरली. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने युवकांची चळवळ उभी करण्याच्या दृष्टीने युवकांसाठीच युवक जाहीरनामा तयार करण्याचे ठरविले आहे, अशी माहिती महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी,
Wake Up Maharashtra – उद्यासाठी आता !#युवा_विचारांची_सत्ता #उद्यासाठी_आत्ता#WakeUpMaharashra #YouthManifesto@RahulGandhi @INCIndia @iyc @ANI @PTI_News pic.twitter.com/ojD8xiFIIp
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) August 1, 2019
राज्यातील युवकांशी चर्चा, बैठका, चर्चासत्र, थेट संवाद, युवक मेळावे, प्रश्नोत्तरे, वेगवेगळ्या स्पर्धा आणि युवकांना आवडतील अशा अनेक उपक्रमांद्वारे महाराष्ट्रातील तरुणांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न युवक काँग्रेस करणार आहे. पुढील 45 दिवस महाराष्ट्रातील वेगवेगळ्या तालुक्यांत हे कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
महाराष्ट्रात युवक संवाद साधण्यासाठी राज्यात युवक काँग्रेसने कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे. युवकांचा जाहीरनामा निवडणूकी आधी तयार केला जाईल, वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातील, अशी माहिती तांबे यांनी दिली. युवकांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याची आमची भूमिका असेल, असंही ते म्हणाले.
महाविद्यालयीन निवडणुका ताकदीने लढू : सत्यजीत तांबे
राज्यात पुन्हा महाविद्यालयीन निवडणुका होणार असल्याची घोषणा करण्यात आली. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. गेल्या काही वर्षांपासून या निवणुका होत नव्हत्या, त्यामुळे राज्याचं मोठं नुकसान झालं. भाजपची ही खेळी असली, तरी आम्ही महाविद्यालयीन निवडणुका ताकदीने लढू, असा इशारा तांबे यांनी दिली.
मुख्यमंत्री यात्रेवर, मग राज्याकडे कोण पाहाणार : सत्यजीत तांबे
मुख्यमंत्री जनादेश यात्रा काढत आहेत. यात्रा काढून काय साध्य होणार आहे? मुख्यमंत्री तिकडे व्यस्त राहणार, तर राज्याचा कारभार कोण पाहणार? म्हणजे त्यांचे फक्त सत्तेसाठी प्रयत्न सुरु आहेत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेवर सत्यजीत तांबे यांनी निशाना साधला.