श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी मोठा दहशतवादी हल्ला झालाय, ज्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले आहेत. उरीमध्ये सप्टेंबर 2016 मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. गुरुवारी श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपोरा भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हा हल्ला केला. हल्ल्यानंतर दक्षिण काश्मीरमधील अनेक भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय.
दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. आदिल अहमद डार नावाच्या दहशतवाद्याने या हल्ल्याचा कट रचला असल्याचं बोललं जातंय. आदिल हा पुलावामातील काकापोरा भागात राहोत. दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या 54 व्या बटालियनवर हल्ला केला.
सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी हायवेवर उभा असलेल्या एका गाडीमध्ये आयईडी ब्लास्ट केला आणि त्यानंतर सीआरपीएफच्या ताफ्यावर फायरिंग सुरु केली. सीआरपीएफच्या वाहनामध्येही आयईडी ब्लास्ट करण्यात आल्याची माहिती आहे. काही जवानांचा जागेवरच मृत्यू झाला, तर काही जवानांना उपचारासाठी नेताना ते शहीद झाले. आणखी 10 जवान गंभीर जखमी असल्याचं बोललं जातंय. ज्या ताफ्यावर हल्ला झाला, त्या ताफ्यामध्ये अडीच हजार जवान असल्याची माहिती आहे.
हल्ल्याची माहिती मिळताच भारतीय सैन्य, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या तुकड्या घटनास्थळी रवाना झाल्या. सैन्याकडून वाहतूक बंद करण्यात आली असून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलंय. याशिवाय पुलवामा, शोपिया, कुलगाम आणि श्रीनगर जिल्ह्यांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आलाय. जखमी जवानांवर उपचार सुरु असून वरिष्ठ अधिकारीही घटनेवर नजर ठेवून आहेत.
उरी हल्ल्यानंतर सर्वात मोठा हल्ला
18 सप्टेंबर 2016 रोजी दहशतवाद्यांनी उरीमध्ये मोठा हल्ला केला होता. सैन्याच्या कॅम्पमध्ये झोपलेल्या सैनिकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्या हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते. संपूर्ण देश या हल्ल्याने हळहळला होता आणि प्रत्येकाच्या मनात बदला घेण्याचीच भावना होती. या हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्तानला इशारा दिला होता. ज्यानंतर एका यशस्वी ऑपरेशनअंतर्गत सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला.
उरी हल्ल्यानंतर 28-29 सप्टेंबरच्या रात्री भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. भारतीय सैन्याच्या विशेष पथकांनी ही मोहिम यशस्वी केली होती. विशेष म्हणजे सर्वच्या सर्व जवान ही मोहिम यशस्वी करुन सुखरुपपणे माघारी परतले होते. 50 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा तेव्हा करण्यात आला होता.