धरण रिकामं असताना काय करत होतात? सुनील केंद्रेकरांनी अधिकाऱ्यांना झापलं
गळती लागल्यामुळे हे धरण फुटण्याच्या मार्गावर आहे. पण चार वर्ष प्रकल्प कोरडा दुरुस्ती का केली नाही, असा सवाल करत अधिकाऱ्यांना त्यांनी झापलं. याबाबत त्यांनी पाटबंधारे विभागाला सवाल विचारत धारेवर धरलं.
जालना : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जालन्यातल्या अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलंय. भोकरदनमधील धामणा धरणाची विभागीय आयुक्तांनी स्वतः पाहणी केली. गळती लागल्यामुळे हे धरण फुटण्याच्या मार्गावर आहे. पण चार वर्ष प्रकल्प कोरडा दुरुस्ती का केली नाही, असा सवाल करत अधिकाऱ्यांना त्यांनी झापलं. याबाबत त्यांनी पाटबंधारे विभागाला सवाल विचारत धारेवर धरलं.
धक्कादायक म्हणजे धामणा सांडव्याची गळती थांबवण्यासाठी अधिकाऱ्यांकडून ताडपत्रीने झाकण्याचा प्रकारही उघडकीस आलाय. सुनील केंद्रेकर यांनी स्वतः धरणावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या धरणामुळे परिसरातील गावांना धोका निर्माण झालाय. कारण, सतत पाऊस सुरु असल्याने पाणीसाठा वाढतोय आणि गळतीही वाढली आहे.
सुनील केंद्रेकर यांच्यावर त्यांचाच विभाग म्हणजे मराठवाड्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी बीडमध्ये जिल्हाधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द गाजली होती. पण त्यांची बदली करण्यात आली. आता पुन्हा एकदा ते मराठवाड्यात आले आहेत.
धामणा धरण परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
धोकादायक बनललेल्या या धरण क्षेत्रातील सांडव्यामध्येच 2 दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. भिंतीला असलेली मोठ्या प्रमाणातील गळती पाहता, जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्त यांच्याशी आणि पाठबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचं मत जाणून घेऊन धामणा धरण क्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा म्हणून स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचप्रमाणे NDRF च्या टीमला आणि औरंगाबाद येथील आर्मीच्या टीमला ही सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.