पंढरपुरात एकादशीच्या दुसऱ्याच दिवशी मठाधिपतीची हत्या
एकादशीच्या दुसऱ्याच दिवशी पंढरपुरात मठाधिपतीची हत्या (Mathadhipati murder in pandharpur) करण्यात आली आहे.
पंढरपूर : एकादशीच्या दुसऱ्याच दिवशी पंढरपुरात मठाधिपतीची हत्या (Mathadhipati murder in pandharpur) करण्यात आली आहे. ही घटना आज (7 जानेवारी) शहरातील मारुतीबुवा कराडकर यांच्या मठात घडली आहे. या घटनेमुळे वारकरी सांप्रदायात शोककळा पसरली आहे. जयवंत बुवा पिसाळ असं हत्या (Mathadhipati murder in pandharpur) झालेल्या मठाधिपतीचं नाव आहे.
पंढरपूर शहरात मारूतीबुवा कराडकर यांचा मठ आहे. या मठाच्या मठाधिपतीवरून विद्यमान मठाधिपती जयवंत बुवा पिसाळ (30) आणि माजी मठाधिपती बाजीराव बुवा कराडकर (35) यांच्यात मठाधिपती पदावरून वाद सुरु होता. जवळपास एक वर्षापासून हा वाद सुरू झाला होता. याच वादातून आज पंढरपूरात विद्यामान मठाधिपतीचा खून झाला आहे.
कराडकर मठात आज दुपारी दोनच्या सुमारास मठाधिपती जयवंत बुवा पिसाळ यांना बाजीराव बुवा कराडकर याने मारहाण सुरू केली. बाजीराव बुवा याने चाकू घेऊन जयवंतबुवा यांच्यावर वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात जयवंत बुवा यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीसांनी घटनास्थळी पोहचल्यानंतर पंचनामा करून आरोपी बाजीराव बुवा याला ताब्यात घेतलं आहे.
एकादशीच्या दुसऱ्याचदिवशी मठाधिपती वादातून झालेल्या या घटनेनंतर वारकरी सांप्रदायात शोककळा पसरली आहे. पंढरपुरात प्रथमच वारकरी सांप्रदायाशी संबंधित दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर पंढरपूरातील वारकरी सांप्रदायातील लोक मठात जमा झाले होते.