माथेरानमध्ये देशातील विक्रमी पाऊस, टॉप 10 मध्ये महाराष्ट्रातील 7 शहरं
देशातील सर्वाधिक पावसाची नोंद ही कर्जतमधील माथेरान याठिकाणी करण्यात आली आहे. माथेरानमध्ये गेल्या 24 तासात 440 मिमी पाऊस पडला आहे. त्यानंतर अलिबागमध्ये 411 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या 24 तासात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे देशासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. देशातील सर्वाधिक पावसाची नोंद ही कर्जतमधील माथेरान याठिकाणी करण्यात आली आहे. माथेरानमध्ये गेल्या 24 तासात 440 मिमी पाऊस पडला आहे. त्यानंतर अलिबागमध्ये 411 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. स्कायमेट या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.
स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात कर्जतमधील माथेरानमध्ये सर्वाधिक 440 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अलिबाग शहराची नोंद करण्यात आली असून 411 मिमी पाऊस पडला आहे.
देशात विक्रमी पावसाची नोंद झालेल्या ठिकाणामध्ये महाराष्ट्रातील 7 शहरांची नावे आहेत. त्यात माथेरान, अलिबाग, ठाणे, महाबळेश्वर, रत्नागिरी, नाशिक, वेंगुर्ला यांचा समावेश आहे.
स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, माथेरान 440 मिमी, अलिबाग 411, ठाणे 342 मिमी, महाबळेश्वर 306 मिमी, रत्नागिरी 154, नाशिक 99 मिमी, वेंगुर्ला 93 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर गुजरातमध्ये वलसाडमध्ये 178 मिमी, वडोदरा 119 मिमी आणि तेलंगणा अदिलाबाद 72 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
कर्जत-लोणावळा रेल्वेमार्गावर दरड
कर्जत-लोणावळा रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. मिडल आणि डाऊन लेन बंद केल्याची माहिती आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खोपोलीतून जादा एसटी गाड्या सोडून लोणावळ्यापर्यत व्यवस्था करण्यात आली आहे.