MNS-BJP | नव्या पर्वाला सुरुवात?, राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात बैठक सुरू; दिल्लीत प्रचंड हालचाली
मनसे आणि भाजप युतीच्या नव्या पर्वाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते अमित शाह यांच्यात युती बाबत बैठक सुरू झाली आहे. दिल्लीत या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे आणि भाजप नेते विनोद तावडे उपस्थित आहेत
संदीप राजगोळकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी दिल्ली | 19 मार्च 2024 : मनसे आणि भाजप युतीच्या नव्या पर्वाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते अमित शाह यांच्यात युती बाबत बैठक सुरू झाली आहे. राजधानी दिल्लीत या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे आणि भाजप नेते विनोद तावडे उपस्थित आहेत. मनसेला किती जागा सोडल्या जाणार ? महायुती कशी असेल ? महायुतीत मनसेचं स्थान काय असेल ? आणि राज्यात मनसेचं स्थान काय असेल ? मनसे राज्यातील सत्तेत असेल की नाही ? याबाबतही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
राज ठाकरे काल रात्रीच दिल्लीत दाखल झाले. कालच ते अमित शाह यांची भेट घेतील असं सांगितलं जात होतं. मात्र रात्री भेट झाली नाही . त्यानंतर आज सकाळी ठाकरे शाह यांची भेट होईल असंही बोललं जात होतं. मात्र अमित शाहांच्या भेटीपूर्वी भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी आले. राज ठाकरे हे हॉटेल मानसिंगमध्ये उतरले आहेत. तेथेच तावडे यांनी त्यांची भेट घेतली, त्यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर विनोद तावडे आणि राज ठाकरे, तसेच त्यांचे पुत्र अमित ठाकरे हे अमित शाह यांच्या निवासस्थानी निघाले. या बैठकीत लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेला किती जागा दिल्या जातात, मनसेकडून किती जागांची मागणी केली जाते हे पाहणंही महत्वाचं ठरेल.
हे तर शुभ संकेत
दरम्यान अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या बैठकीवर भाजप नेते, आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब काही दिवस आधी शुभ संकेत दिले होते. राज ठाकरेंनी हिंदुत्वाची व्यापक भूमिका घेतलेली दिसतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतील विकसित भारत करण्यासाठी आणि हिंदुत्वाची भूमिका घेऊन जर ठाकरे साहेब सोबत येत असतील तर निश्चित त्याच्या आनंद होईल, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली आहे.
मनसेला मुंबईतील जागा मिळणार ?
दरम्यान, राज ठाकरे यांची ताकद मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळे राज ठाकरे महायुतीत आल्यास त्यांना मुंबईतील जागा सोडल्या जाऊ शकतात असा कयास लढविला जात आहे. याशिवाय राज ठाकरे यांना पुणे, ठाणे, नाशिक आणि औरंगाबादमध्येही जागा मिळतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पहिल्यांदाच युती
दरम्यान, राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढली. त्यांनी कोणत्याही पक्षाशी युती केली नाही. महापालिकेपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत राज यांची भूमिका एकला चालो रे राहिली आहे. मात्र, आता राज ठाकरे महायुतीत आल्यास त्यांच्या अलायन्सच्या राजकारणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे राज या महायुतीत येतात का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.