चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत, जयंत पाटलांचे बाबासाहेबांना पत्र
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिलं आहे. (Jayant Patil Tribute Letter to Dr. Babasaheb Ambedkar)
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा आज (6 डिसेंबर) 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे. दरवर्षी यानिमित्ताने लाखो अनुयायी दादरच्या शिवाजी पार्कवरील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी गर्दी करतात. या पार्श्वभूमीवर यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येता पत्त्यावर पत्र पाठवून अभिवादन करा, असे आवाहन काही सामाजिक संस्थांकडून अनुयायांना करण्यात आलं आहे. (Jayant Patil Tribute Letter to Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Day)
या सूचनेचं पालन करत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी या पत्रातील मजकूर सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट केला आहे.
जयंत पाटील यांचे पत्र
प्रिय बाबासाहेब,
“देशभरातील कोरोनाचे संकट कमी झाले नसल्याने यंदा आम्ही घरूनच आपल्याला अभिवादन करत आहोत.तुम्ही घालून दिलेल्या विचारांचं आजही आम्ही पालन करत आहोत.म्हणून देश हितासाठी आपल्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याच्या सरकारच्या आवाहनला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आमचे सरकार संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित आहे. इथल्या रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी, उपेक्षित, वंचितांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कार्यरत राहू. महाराष्ट्राचा वारसा असलेल्या पुरोगामी विचारांना तडा न जाऊ देता समता, न्याय, बंधुता या मूल्यांचे आम्ही रक्षण करू.
चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे, इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील याचा मला विश्वास आहे. महापरिनिर्वाण दिनी तुम्हाला विनम्र अभिवादन!,” असे जयंत पाटील यांनी पत्रात लिहिले आहे.
चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे, इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील याचा मला विश्वास आहे. महापरिनिर्वाण दिनी तुम्हाला विनम्र अभिवादन!
आपला, जयंत पाटील#महापरिनिर्वाण_दिवस #DrBRAmbedkar #6december
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) December 6, 2020
थेट प्रक्षेपण पाहता येणार
चैत्यभूमीवरील सर्व कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण महापालिकेच्या समाजमाध्यम खात्यांवरून आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून करण्यात येणार आहे. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून सकाळी 7.45 ते 9 या कालावधीमध्ये शासकीय मानवंदना आणि हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल. त्यानंतर, सकाळी 9.50, 10.50, 11.50 तसेच दुपारी 12.50 वाजता थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. महापरिनिर्वाणदिनी सोशल मीडियावरून ऑनलाईन थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. (Jayant Patil Tribute Letter to Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Day)
संबंधित बातम्या :
PHOTOS: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन; मुख्यमंत्री ते राज्यपालांकडून अभिवादन