नागपूर : “मी सारथीसाठी प्रामाणिक काम करतोय. मी ओबीसी समाजातून आलेलो आहे म्हणून सतत मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे असं वाटत असल्याने, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सारथीची जबाबदारी मराठा मंत्र्याकडे देण्याची विनंती करणार आहे”, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. (Vijay Wadettiwars reaction on Maratha Kranti Morcha)
मराठा क्रांती मोर्चाने विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर, त्यांनी टीव्ही 9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला. सारथी संस्था बंद पडणार नाही हे मी आजही छातीठोकपणे सांगतो. पण यामागे राजकीय मंडळी या मंडळींना चिथावणी देत आहेत, त्यांची नावं योग्यवेळी जाहीर करेन, असं यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले.
“मी प्रामाणिकपणे काम करतोय. पण तरीही तुमचे आरोप झाल्यानंतर मला त्यामध्ये काम करण्यात रस नाही. आमच्या सरकारला केवळ ६ महिने झाले आहेत. मात्र चार महिन्यांपेक्षा जास्त काळ कोरोनामध्ये गेले. सर्वांना माहिती आहे की आर्थिक परिस्थिती बिकट आहे. निधीचा तुटवडा आहे. पण हा निधी मागे-पुढे होईल, मात्र सारथी बंद पाडणार नाही. सारथीसाठी थोडासा वेळ लागणार आहे. सर्व बंद असताना केवळ एकच सारथीची भूमिका लावून धरणं योग्य नाही”, असं वडेट्टीवार यांनी नमूद केलं.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
सारथीचं कोणतंही काम शिल्लक राहिलेलं नाही. निधी कमी असल्यामुळे काही फेलोशिप थांबलीय, पण ती देणारच नाही असं नाही. सारथीसाठी नुकतंच पुण्यात बैठक घेऊन आढावा घेतला. सारथीचं अहित होईल असा एकही निर्णय घेतलेला नाही. मी ओबीसी नेता आहे त्यामुळे माझी भूमिका दुटप्पी वाटत असेल, तर मुख्यमंत्र्यांना विनंती करुन मी जबाबदारी सोपवेन, असं वडेट्टीवारांनी सांगितलं.
मराठा आरक्षणासाठी आम्ही आढावा बैठक घेत आहोत. सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकण्यासाठी उपसमिती नियोजन करत आहे. चांगले वकील देत आहोत. कोर्टात चालढकल होत नसते. कोर्टाचं काम त्यांच्या कामाकाजाच्या स्वरुपानुसार होते. काही शंका असतील तर विजय वडेट्टीवार हा काही शेवटचा माणूस नाही, तुमची भूमिका उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांकडे मांडा, मंत्रालयात ५ टक्के उपस्थिती आहे, अशा परिस्थितीत केवळ सारथी सारथी म्हणून आरोप करणं योग्य नाही, असं वडेट्टीवार म्हणाले. सारथी कधीही बंद पडणार नाही हे वचन मी दिलं होतं, तेच वचन कॅबिनेटमध्ये मांडेन. मराठा मोर्चाने सांगावं कोणत्या मंत्र्याकडे सारथीचं काम द्यावं, त्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं वडेट्टीवारांनी नमूद केलं.
मराठा मोर्चाकडून वडेट्टीवारांच्या राजीनाम्याची मागणी
मराठी क्रांती मोर्चाने सारथी संस्थेवरुन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सारथी संस्थेची स्वायत्तता धोक्यात आणली असून, वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली. पुण्यात आज पत्रकार परिषद घेऊन मराठा क्रांती मोर्चाने वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
(Vijay Wadettiwars reaction on Maratha Kranti Morcha)
संबंधित बातम्या
मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, महाविकास आघाडीतील पहिल्या मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी