पुणेः शहरातील मनसेच्या (MNS) फायरब्रँड नेत्या म्हणून ओळख असलेल्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला असून त्या आता कोणत्या पक्षात जाणार, याविषयी आडाखे बांधले जात आहेत. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर असताना मनसेच्या या अनुभवी पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला. आपण राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर नाराज नाहीत, त्यांच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही, असं वक्तव्य रुपाली पाटील यांनी केलं. आता त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे.
मागील 14 वर्षांपासून मनसेच्या रणरागिणी म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या रुपाली पाटील आता कोणत्या पक्षात जातील, याविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, ज्या पद्धतीनी मी काम करत होते, त्या पद्धतीनीच मला जर राष्ट्रवादी किंवा शिवसेने स्वीकारलं तरच मी जाईन. मनसेच्या ज्या मुशीत मी वाढलीय, त्या पद्धतीनेच जे मला स्वीकारतील त्याच पक्षात मी प्रवेश करेन. अन्यथा सध्या तरी मी माझ्या झाशीची राणी प्रतिष्ठानच्या वतीने काम करत राहीन,” असं वक्तव्य रुपाली पाटील यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना या दोन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करेन, असे संकेत रुपाली पाटील यांनी दिले. पक्षाचा राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे अजितदादा पवार आणि शिवसेनेचे नेते वरुण देसाई यांचीही सदिच्छा भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.
मनसेचा नेमका कोणत्या कारणांमुळे राजीनामा दिला, या प्रश्नाविषयी विचारले असता, रुपाली पाटील म्हणाल्या, ” मनसेत निःस्वार्थी, प्रचंड प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. मी या परिवारात बहीण म्हणून नेहमी त्यांच्यासोबत असेन. पण माझी खदखद मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवेन. पण मला न्याय देत असताना, लोकांना उत्तर देत असताना खंबीरपणे साथीची गरज असते. तिच मिळत नसेल तर कार करणे अवघड होते. याविषयीच्या भावना राज ठाकरे यांच्याकडे व्यक्त केल्या आहेत. आता मला माझ्या गोष्टी परत परत सगळ्यांसमोर बोलून दाखवायच्या नाहीत. सन्माननीय राज ठाकरे माझे दैवत आहेत व राहतील.”
इतर बातम्या-