मोठी घडामोड… राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात खलबतं; बड्या नेत्याचे युतीचे संकेत
महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची आज भेट झाली. त्या दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजप एकत्र सोबत येतील, मनसे महायुतीत सामील होईल, अशा चर्चा सुरू आहेत.
मुंबई | 19 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची आज भेट झाली. त्या दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात काही चर्चा झाली का, हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजप एकत्र सोबत येतील, मनसे महायुतीत सामील होईल, अशा चर्चा सुरू आहेत. याआधी मनसे नेते बाळा नांदगावकर सागर बंगल्यावर जाऊन आले होते. आणि आज राज ठाकरे व आशिष शेलार यांची भेट झाल्याची माहिती समोर आली. सुमारे तासभर हे दोन्ही नेते एकमेकांसोबत होते, चर्चा करत होते.
मुंबईसारख्या भागात लोकसभेमध्ये मनसेची मदत भारतीय जनता पक्ष घेणार अशी चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. त्याच अनुषंगाने आजची शेलार व राज ठाकरे यांची भेट झाली असावी असा अंदाज लावला जात आहे. कारण राज्यातील अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची मराठी व्होटबँक मोठी आहे. आणि त्या खालोखाल मनसेची व्होटबँक देखील मोठी आहे. त्यामुळे त्याचा फायदा करून घेता यावा असा भाजपचा मनसुबा असून, त्यादृष्टीनेच आजची भेट आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बड्या नेत्याचे संकेत काय ?
राज ठाकरे आमच्यासोबत येत असतील तर त्यांच स्वागतच आहे, अशी भूमिका यासंदर्भात भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मांडली. ‘ मनसे असो किंवा भाजप, हे दोन्ही पक्ष एका विचारधारेशी सुसंगत असणारे पक्ष आहेत. एका विचारधारेची लोकं एकत्र येत असतील, तर ते चांगलंच राहील. भारतीय जनता पार्टीचं नेहमीच बेरजेचं राजकारण राहिलेलं आहे. समाजासाठी काम करणं, सर्वांगिण विकास करणं या भूमिकेला प्राधान्य देत असतात. पक्षीय चौकटीच्या बाहेर जाऊन, आणखी चांगले नेते, आणखी चांगले पक्ष महायुतीत आपल्याशी जोडता आले, तर त्या माध्यमातून भक्कम सरकार येऊन, त्या सरकारच्या माध्यमातून लोकांसाठी काम करता येईल, अशी व्यापक भूमिका भाजपची असते. त्यामुळे बेरजेच्या राजकारणाला भाजपने नेहमीच प्राधान्य दिलं आहे’, याचा पुनरुच्चार दरेकर यांनी केला.
उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी भाजप घेणार राज ठाकरेंची मदत ?
मुंबईत उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी भाजप राज ठाकरेंची मदत घेऊ शकतं. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते आणि राज ठाकरेंच्या भेटी वाढल्या आहेत, अशी चर्चा सुरू आहे.
निगेटीव्ह पॉलिटिक्स करण्यापेक्षा सकारात्मक राजकारणावर भारतीय जनता पक्षाचा जास्त भर असतो. त्यामुळे कोणाचे तरी पंख कापायचे आहे, कुणाला तरी शह द्यायचा आहे, यापेक्षा चांगले लोक बरोबर घेऊन, चांगल्या लोकांच्या संगतीने आणखी भक्कमपणे लोकांसाठी काम करता येईल, सर्वांगीण विकासाचं काम करता येईल, अशी व्यापक स्वरूपाची, पॉझिटीव्ह वाटचाल करण्यावर भाजपचा भर असतो, असे प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले. दोघांच्या एकत्रित येण्याने कोणावर तरी परिणाम होत असतो ना, असेही त्यांनी नमूद केले