नागपूर : सोयाबीन उत्पादकांच्या प्रश्नावर मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. “सोयाबीनला हेक्टरी 40 हजारांची मदत द्या, अन्यथा राज्यातील मंत्र्यांना विदर्भात फिरु देणार नाही,” असा इशारा विदर्भातील मनसेचे नेते अतुल वांदीले यांनी दिला आहे. तसेच “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यानंतर विदर्भात यावं,” अशी मागणीही त्यांनी केली आहे. (MNS Demand To Give Help for Vidarbha Farmers)
राज्यात परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन हे अद्यापही पाण्यात आहे. तर काहींनी सोयाबीनची कापणी केल्यानंतर ते वावरातच ठेवल्याने त्याचेही प्रचंड नुकसान झाले आहे. तर अनेकांचे सोयाबीन हे वाहून गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
विदर्भातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं 80 टक्के सोयाबीन हातचं गेलं आहे. त्यामुळे विदर्भातील सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. याच सोयाबीन उत्पादकांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील नुकसानीची पाहणी केली. आता त्यांनी विदर्भातील सोयाबीनच्या नुकसानीची पाहणी करावी, अशी मागणी मनसे नेते अतुल वांदीले यांनी केली आहे.
“मराठवाड्यातील शेतकऱ्यांसोबतच विदर्भातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 40 हजार रुपये मदत जाहीर करावी, अन्यथा राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या मंत्र्यांना विदर्भात फिरु देणार नाही,” असा इशाराही अतुल वांदीले यांनी दिला आहे. तसेच “जर सोयाबीन उत्पादकांना मदत मिळाली नाही, तर शेतकऱ्यांसह आंदोलन करु,” असा इशाराही मनसेनं दिला आहे. (MNS Demand To Give Help for Vidarbha Farmers)
संबंधित बातम्या :
शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या, काँग्रेसच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
‘माझे लेकरु मला परत द्या’ आईच्या हंबरड्यानंतर प्रवीण दरेकरांनाही अश्रू अनावर