‘मिशन मंगल’च्या मराठी डबिंगच्या गैरसमजातून मनसेचा विरोध
अक्षयकुमारचा 'मिशन मंगल' चित्रपट मराठीत डब होणार असल्याच्या गैरसमजातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केल्याचं समोर आलं आहे. मात्र या सिनेमातील केवळ एक गाणंच मराठीत डब होत असल्याचं निर्मात्यांकडून स्पष्ट करण्यात आलं.
मुंबई : सुपरस्टार अक्षयकुमार (Akshay Kumar) चा महत्त्वाकांक्षी ‘मिशन मंगल’ (Mission Mangal) चित्रपट येत्या 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं मराठीत डबिंग करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला होता. मात्र हा वाद केवळ गैरसमजातून उभा राहिल्याचं समोर आलं आहे.
अक्षय कुमारने ‘ये सिंदूर..’ ही कविता मराठीत म्हणत असतानाचा प्रोमो ट्विटरवर शेअर केला होता. त्यानंतर मनसेने ‘मिशन मंगल’ मराठीमध्ये डब करण्यास विरोध केला. प्रादेशिक चित्रपटांवर अन्याय होण्याचं कारण मनसेने सांगितलं.
‘मिशन मंगल हा चित्रपट मराठीत डब करुन प्रदर्शित केला, तर मराठी भाषेतील सिनेमांना विनाकारण स्पर्धा निर्माण होईल. मूळ हिंदी चित्रपटाला आमचा विरोध नाही’ असं महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेने (मनचिसे) चे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी स्पष्ट केलं.
‘आधीच मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये पुरेशा स्क्रीन्स मिळत नाहीत. जर हे चित्रपट मराठीमध्ये डब केले, तर मराठीसाठी राखीव पडद्यांवरही आक्रमण होईल. त्यामुळे मराठी चित्रपटांना आर्थिक फटका बसेल’ असं मत अमेय खोपकर यांनी व्यक्त केलं.
हिंदी सिनेमा मराठीत डब!
मिशन अमंगल!
लक्षात ठेवा, गाठ माननीय राजसाहेबांच्या महाराष्ट्र सैनिकांशी आहे!@mnsadhikrut pic.twitter.com/WKWjgaRhRE
— Shalini Thackeray (@ThakareShalini) August 2, 2019
केवळ एक गाणं मराठीत
अक्षयने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये केवळ मराठीच नाही, तर पंजाबी, बंगाली आणि गुजराती भाषेचाही समावेश आहे. ‘मुळात हा चित्रपट मराठीत डब केला जाणार नव्हताच. केवळ या चित्रपटातील एका गाण्याचं मराठीत डबिंग होणार होतं. हा चित्रपट महिला शास्त्रज्ञांविषयी असल्याने गाण्यातून महिला सक्षमीकरणावर भावना मांडल्या आहेत.’ असं चित्रपटाच्या टीममधील एका व्यक्तीने ‘हिंदुस्थान टाइम्स’शी बोलताना सांगितलं.
गैरसमजातून वाद
‘महिला सबलीकरणाचा नारा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा, यासाठी अधिकाधिक भाषांमध्ये त्याचं डबिंग करण्याचा चित्रपट निर्मात्यांचा मानस आहे. मात्र अख्खा चित्रपट मराठीत डब करण्याच्या गैरसमजातून मनसेने विरोधाचं अस्त्र उगारलं’ असंही चित्रपटाच्या टीमकडून सांगण्यात आलं.
2013 मधील ‘इस्रो’च्या महत्त्वाकांक्षी ‘मंगलयान’ प्रकल्पावर या चित्रपटाचं कथानक आधारित आहे. अक्षय कुमारने ज्येष्ठ वैज्ञानिक राकेश धवन यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. अक्षयसोबत विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, कीर्ती कुल्हारी, शर्मन जोशी यांच्याही मुख्य भूमिका आहेत.