मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आलेल्या धमकीच्या फोनचा NIA कडून तपास करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केली आहे. काल (6 सप्टेंबर) उद्धव ठाकरेंचे निवासस्थान मातोश्री उडवण्याची धमकी आली होती. दुबईहून कॉल करुन ही धमकी देण्यात आली होती (MNS Sandeep Deshpande on Uddhav Thackeray threat call).
संदीप देशपांडे म्हणाले, “आतंरराष्ट्रीय कॉल असल्याने हे प्रकरण गंभीर आहे. आमचा मुंबई पोलिसांच्या सुरक्षेवर विश्वास आहे, ते त्यांच्या सुरक्षेची कामगिरी चोख बजावतील. पण आंतरराष्ट्रीय कॉल असल्याने तो कुठल्या दहशतवादी टोळीशी संबंधित आहे का याचाही तपास होणे गरजेचे आहे. त्यामुळे NIA तपासाची मागणी करत आहोत.”
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांचे वांद्र्यातील खासगी निवासस्थान असलेलं मातोश्री उडवून देऊ, अशी धमकी काल देण्यात आली आहे. दुबईवरुन मातोश्रीवर धमकीचे तीन ते चार फोन आले. त्या फोनवरुन मातोश्री उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने हे फोन केल्याचे समोर येतं आहे. हे धमकीचे फोन आल्यानंतर मातोश्री निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मुंबईच्या क्राईम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार, रात्री 2 वाजता दुबईवरुन मातोश्रीवर एक फोन आला. या फोनवरील व्यक्तीने दाऊदला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे असल्याचं सांगत कॉल ट्रान्सफर करण्यास सांगितले. मात्र कॉल ऑपरेटरने फोन ट्रान्सफर केला नाही. सध्या याबाबतची चौकशी सुरु आहे.
छातीचा कोट करुन मातोश्रीचे रक्षण करु – अरविंद सावंत
“मातोश्रीला यापूर्वी अशा अनेक धमक्या आल्या. केसाला धक्का लावण्याची हिंमत नाही. शिवसैनिकांच्या छातीचा कोट करु आणि मातोश्री सुरक्षित राखू. अशा धमक्या भरपूर बघितल्या. उंदरासारखे बिळात लपून धमकी देणार आम्ही भरपूर पाहिले आहेत. पण सरकारनेही याबाबतची गंभीर दखल घेतली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया खासदार अरविंद सावंत यांनी दिली.
संबंधित बातम्या :
दाऊद इब्राहिमच्या नावे मुख्यमंत्र्यांना फोन, ‘मातोश्री’ उडवण्याची धमकी
दाऊदच्या सात पिढ्या खाली आल्या तरी ‘मातोश्री’चे वाकडे करु शकणार नाही, एकनाथ शिंदेंची गर्जना