सावरकरांबद्दल अपमानजनक बोलाल तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही – संदीप देशपांडे यांचा राहुल गांधींना इशारा
स्वा.सावरकर यांच्याबद्दल काही अपमानजनक बोलाल तर खपवून घेणार नाही, महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा स्पष्ट इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राहुल गांधी यांना दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे
मुंबई | 13 मार्च 2024 : स्वा.सावरकर यांच्याबद्दल काही अपमानजनक बोलाल तर खपवून घेणार नाही, महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा स्पष्ट इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राहुल गांधी यांना दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. महाराष्ट्रात येऊन शिवाजी पार्क मैदानात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलाल तर खपवून घेतलं जाणार नाही. राहुल गांधी यांच्या शिवाजी पार्क येथील सभेआधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी हा थेट इशारा दिला आहे. तसेच संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावरही निशाणा साधला आहे.
छत्रपती शिवाजी पार्क हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकासमोर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं घर हे या मैदानाच्या जवळ आहे. तुम्ही महाराष्ट्रात येताय, तुमचं जे म्हणणं आहे ते मांडा, त्याला आमची ना नाही. पण इथे येऊन जर मागच्या वेळेसारखं स्वा. सावरकर यांच्याबद्दल कुठलंही अपमानजक वक्तव्य केलं किंवा काही अद्वातद्वा बोललात तर ही महाराष्ट्राची 14 कोटी जनता राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरायला देणार नाही, असा थेट इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.
ठाकरे गटाचा लांडगे म्हणून उल्लेख
‘आणि या कोल्ह्यांसोबत जे लांडगे सामील झाले आहेत, त्यांनीपण हे लक्षात ठेवावं, महाराष्ट्रात त्यांची मग काही खैर नाही. त्या कोल्हेकुईला साथ देणाऱ्या लांडग्यांनाच सांगतोय. आमचा इशारा आहे’ अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी ठाकरे गटालाही सुनावलं. हा ईशारा देत असताना देशपांडे यांनी काँग्रेसचा कोल्हे म्हणून तर ठाकरे गटाचा लांडगे म्हणून उल्लेख केला.
येत्या 17 तारखेला राहुल गांधी यांती शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. त्यापूर्वीच मनेसेने हा स्पष्ट शब्दांत इशारा दिलाय.