वीज बिल वसुलीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, औरंगाबादमधील कन्नड शहरात शेकडो शेतकरी रस्त्यावर
ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांची वीजबिलं थकल्याने महावितरणने सक्तीची कारवाई करत वीज बिल वसुली सुरु केली आहे. कन्नडमध्ये महावितरणच्या या कारवाईविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं.

औरंगाबादः जिल्ह्यातील कन्नड शहरात आज शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. गेल्या काही दिवसांपासून महावितरण तर्फे शेतकऱ्यांकडून सक्तीने वीज बिल वसुली केली जात आहे. त्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट होती. आज महावितरणच्या या वसुलीविरोधात शेतकऱ्यांचा असंतोष उफाळून आला.
हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वात मोर्चा
महावितरणने शेतऱ्यांकडून सक्तीने सुरू असलेल्या वीज बिल वसुलीच्या निषेधार्थ कन्नड शहरात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले होते हा मोर्चा काढल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी महावितरण कार्यालयाला थेट लीगल नोटीस दिलेली आहे. यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
वीजबिल वसुलीसाठी महावितरण आग्रही
औरंगाबादमधील ग्रामीण भागात शेतकऱ्यांची वीज बिले थकल्याने महावितरणने कमी दाबाने वीजपुरवठा करणे तसेच वीज पुरवठा खंडीत करण्यासारख्या कारवाया सुरु केल्या आहेत. कन्नडमधील वीज न भरलेल्या शेतकऱ्यांवरही महावितरणने कारवाई केली होती. या विरोधात शेतकऱ्यांनी आज आंदोलन केलं.
इतर बातम्या-