सोलापूर : कोरोनाचा शिरकाव भारतात झाला आणि खबरदारी म्हणून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात (Mumbai and Pune citizen return to village) आले. कंपन्या बंद झाल्या, उद्योगधंदे बंद झाले. त्यामुळे कामानिमित्त महानगरामध्ये असणाऱ्या लोकांनी गावाकडची वाट धरली. काही लोकांना लॉकडाऊन सुरु होण्याचा अंदाज आला आणि कुटुंबासह त्यांनी गाव गाठलं. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत परवानगी घेऊन एकूण दीड लाखांपेक्षा अधिक लोकांनी प्रवेश केला आहे. तर जवळपास लाखांपेक्षा अधिकांनी छुप्या पद्धतीने जिल्ह्यात प्रवेश केला (Mumbai and Pune citizen return to village) आहे.
पहिला लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर अनेकांनी छुप्या पद्धतीने येऊन गाव गाठलं. त्यात काही जणांवर कारवाई करण्यात आली तर काही जणांना गावातल्या लोकांनी प्रशासनाच्या नजरेत आणून अशा लोकांना क्वारनटाईन होण्यास भाग पाडले. सोलापूर शहरात तर छुप्या पद्धतीने येणाऱ्यांची संख्याही जास्त होती. लॉकडाऊन तीनमध्ये सरकारने लोकांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी परवानगी दिली होती.
सरकारने परवानगी दिल्यानंतर आतापर्यंत जिल्ह्यात पुणे येथून 90 हजार लोकं, मुंबईतून 31 हजार 232 जण, इतर जिल्ह्यातून 33 हजार लोक जिल्ह्यात आले आहेत. तर अनधिकृतपणे गाव गाठलेल्या लोकांची संख्या ही लाखांच्यावर असल्याचा अंदाज आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यात अधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या लोकांची थर्मल स्कॅनिंग झाली आहे. शहरात येणाऱ्या लोकांची थर्मल स्कॅनिंग केली जात आहे. संशय वाटल्यास सिव्हिल हॉस्पिटलकडे तपासणीसाठी घेऊन गेले जात आहे. याशिवाय ग्रामीण भागातील लोकांना क्वारनटाईनसाठी शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. क्वारनटाईनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना गावातील घरात प्रवेश दिला जात आहे. तर काही गावात याची कठोर अंलबजावणी होत आहे तर काही गावात फारसं गांभीर्याने घेतलं जात नाही.
सोलापूर जिल्ह्यातून प्रशासनाने परराज्यातील 10800 मजुरांना दहा गाड्यातून त्यांच्या मूळगावी पाठवले असून त्यासाठी प्रशासनाला 62 लाख रुपयांचा खर्च आला आहे. याशिवाय 114 बसने मजुरांना त्यांच्या मूळगावी पाठवण्यात आले आहे. तर 15 साखर कारखान्यांकडील 2513 मजुरांनाही त्यांच्या मूळगावी पाठवण्यात आले आहे. शिवाय सरकारी यंत्रणेची वाट न पाहता पायी, मोटारसायकल किंवा जमेल त्या वाहनांनी सोलापूर सोडणाऱ्यांची संख्या ही 15 हजाराहून अधिक आहे.
संबंधित बातम्या :
गड्या आपला गाव बरा! महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सव्वा लाख पुणेकर परतले
लॉकडाऊनमुळे मजुरांची गावाकडे धाव, घरात वेगळी रुम नसल्यानं झाडावर क्वारंटाईन