मुंबईच्या नागपाडा भागातील सिटी सेंटर मॉलला काल (22 ऑक्टोबर) रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. (Mumbai City Central mall fire Photos)
Follow us
मुंबईच्या नागपाडा भागातील सिटी सेंटर मॉलला काल (22 ऑक्टोबर) रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. यात अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत.
मुंबई सेंट्रलजवळील बस स्थानकाच्या जवळ असलेल्या सिटी सेंटर मॉलला काल (22 ऑक्टोबर) रात्री सुमारे 8 वाजून 53 मिनिटांनी आग लागली. एका दुकानात झालेल्या शॉटसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पहाटेच्या सुमारास ही आग मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने Level 5 ची आग असल्याचे घोषित केले.
सिटी सेंटर मॉल ही तळमजला अधिक तीन मजले स्वरूपाची इमारत आहे. सुरुवातीला या मॉलमधील दुसऱ्या मजल्यावर आग लागली.
या मजल्यावर मोबाईल, प्रिंटर, स्टेशनरी, फर्निचर आणि इतर साहित्यांचे गाळे आहेत. या गाळ्यांना ही आग लागल्याचे समोर आले. अवघ्या काही मिनिटातचं ही आग तिसऱ्या मजल्यावर पसरली.
ही आग विझवण्यासाठी 24 फायर इंजिन, 16 जम्बो टँक यांच्यासह एकूण 50 अग्निशमन दलाची वाहने कार्यरत आहेत.
मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे स्वत: घटनास्थळी उपस्थित आहे. सुमारे 250 अधिकारी आणि कर्मचारी ही आग विझवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.
या आगीची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार अमीन पटेल, महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकानी यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट दिली. तसेच प्रत्यक्ष परिस्थितीही जाणून घेतली.
सिटी सेंटर मॉलला अगदी लागून असलेल्या ऑर्किड एन्क्लेव या 55 मजली इमारतीतील अंदाजे 3 हजार 500 रहिवाशांचे जवळच्या मैदानामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून दिली जात आहे.
मुंबई अग्निशमन दलाच्या कार्यामध्ये वाहतूक आणि इतर बाबींमध्ये मदतीसाठी पोलिसांना देखील तैनात करण्यात आले आहे.
सिटी सेंटर मॉल आगीची तीव्रता लक्षात घेता बेलासिस रोडवरील दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी मार्ग बंद करण्यात आले आहेत.