चलो गोवा, आनंदाची बातमी, अखेर ‘या’ महिन्यात मुंबई – गोवा महामार्ग वाहनांसाठी होणार खुला
सध्या मुंबई ते गोवा महामार्गावर मान्सूनची तयारी पूर्ण केली जात आहे. दरम्यान, पावसाळ्यात वाहतूक सुरळीत रहावी यासाठी कंत्राटदार रस्ता चांगला रहावा यासाठी प्रयत्न करीत आहेत.
तब्बल एक तप रखडलेला मुंबई ते गोवा हा महामार्ग एकदाचा मार्गी लागणार आहे. मुंबई ते गोवा महामार्गाच्या बांधकामावरुन अनेक राजकारण्यांनी टीका केली आहे. राज ठाकरे यांच्यापासून ते नितीन गडकरी यांनी या महामार्गाच्या बांधकाम आणि रखडपट्टीवरुन टीका केली आहे. त्या मार्गाची कहाणी एकदाची सफळ संपूर्ण होत आहे. या महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर हा 84 किमीचा टप्पा यंदाच्या डिसेंबरअखेर पूर्ण होणार असल्याचे नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया यांनी म्हटले आहे. सध्या पावसाळ्यात वाहतूक सुरळीत ठेण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. मान्सूनपूर्व कामे सुरूआहेत असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
राज्यातला सर्वात मोठा मुंबईत ते नागपूर 700 किमीचा समृद्धी महामार्ग पूरा होत आला तरी मुंबई ते गोवा महामार्गाचे भिजत घोंगडे कायम असल्याने अनेकदा यावर विरोधी पक्षांसह समाजाच्या विविधस्तरातून टीका होत आहे. मुंबई गोवा महामार्गाची एक मार्गिका गेल्यावर्षी गणपती महोत्सवासाठी खुली करण्यात आली होती. यंदा गणपती 7 सप्टेंबर रोजी आहेत. त्यामुळे यंदाही कोकणात गणपतीच्या सणासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई – गोवा महामार्गाचा वापर करता येणार की नाही असा सवाल केला जात आहे.
मुंबई कोकण आणि गोवा दरम्यानची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी 12 वर्षांपूर्वी 555 किलोमीटरचा मुंबई ते गोवा हायवेच्या चौपदरीकरणाचे काम सुरु झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की पनवेल ते कासू 42 किमीच्या टप्प्याचे काम 99 टक्के पूर्ण झाले होते. या महामार्गाचे काम 44,000 कोटी रुपयांतून सुरु आहे. संपूर्ण योजनेचे काम दहा पॅकेजमध्ये सुरु होते. त्यातील सहा पॅकेज पूर्ण झाले. पॅकेज तीनचे काम शिल्लक असून तेथे बोगदा बांधण्याचे काम सुरु आहे. त्याची एक बाजू आधीच सुरु करण्यात आली आहे. तर दुसरी बाजू 15 जुलैनंतर वाहनांसाठी खुली करण्यात येणार आहे. याच बरोबर पॅकेज क्रमांक 1 चे काही जुजबी कामे शिल्लक आहे ती डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होतील अशी माहीती या अधिकाऱ्याने दिली आहे.
सहा ते आठ तासांत चलो गोवा
एकदा हा मार्ग सुरु झाली की मुंबई ते गोवा हे अंतर सहा ते आठ तासांत कापता येणार आहे. पनवेल ते इंदापूर हे 84 किमीचे अंतर दोन पॅकेजमध्ये विभागले आहे. तर पनवेल ते कासू हे 42 किमीचे काम 99 टक्के पूर्ण झाले आहे. आणि कासू ते इंदापूर हे उरलेले 42 किमीचे काम युद्धस्तरावर सुरु आहे. या पॅकेजमधील जमीनीवरचे काम 45 टक्के पूर्ण झाले आहे. मुंबईतील शिवडी ते न्हावाशेवा ट्रान्सहार्बर लिंक झाला, मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग पूर्ण होत आला तरीही मुंबई ते गोवा महामार्ग रखडल्याने तो चेष्टेचा आणि टीकेचा विषय ठरला होता.