नांदेडमध्ये सख्खी बहीण आणि तिच्या प्रियकराची हत्या, भावाला फाशीची शिक्षा
विवाहित बहिणीसह तिच्या प्रियकराची हत्या करणाऱ्या भावाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर मदत करणाऱ्या चुलत भावाला जन्मठेप ठोठावण्यात आली आहे.
नांदेड : विवाहित बहिणीसह तिच्या प्रियकराची हत्या करणाऱ्या भावाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर मदत करणाऱ्या चुलत भावाला जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. भोकर तालुक्यातील दिवशी इथे दोन वर्षांपूर्वी हे दुहेरी हत्याकांड झालं होतं. याप्रकरणी नांदेडच्या भोकर जिल्हा कोर्टात सुनावणी झाली. न्यायालायने मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. तर आरोपीला मदत करणाऱ्या चुलतभावाला जन्मठेपेची शिक्षा दिली.
मुख्य आरोपी दिगंबर दासरेने आपल्या विवाहित बहिणीसह तिच्या प्रियकराची हत्या केली होती. या दोघांच्या हत्येनंतर आरोपी स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाला होता.
आरोपी दिगंबर दासरेची बहिण पूजाचे लग्न हत्येच्या दीड महिन्यापूर्वी झाले होते. पण पूजाचे लग्नापूर्वी साधारण 3 वर्षांपासून गावातील गोविंद कराळे याच्याशी प्रेमसंबंध होते. यामुळे पूजा सासरहून 22 जुलै 2017 रोजी कुणालाही काही न सांगता निघून गेली होती. आपली बहिण आणि तिचा प्रियकर तेलंगणात असल्याचे दिगंबरला समजले. यावरुन आरोपीने तिथे जाऊन त्यांची भेट घेतली. दोघांना समजावून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र बहिण ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती, तरीही तो दोघांना घेऊन भोकरकडे येत होता. त्यावेळी तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आरोपी दिगंबरने दोघांचीही हत्या केली.
दोघांच्याही जाती वेगवेगळ्या होत्या. लग्नानंतरही बहिणी पळून गेल्याने आरोपी भावाला राग अनावर झाला होता. त्या रागातून सख्ख्या भावाने बहिणीला आणि तिच्या प्रियकराला संपवलं होतं.
या खटल्यात भोकर न्यायालयाने साक्षी पुरावे तपासात आज निकाल दिला. या खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी भोकरच्या न्यायालयाबाहेर नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबत तैनात केला होता.
ऑनर किलिंगसारखाच हा प्रकार असल्याने घटना घडली त्यावेळेस हा प्रकार फार चर्चीला गेला होता. विशेष म्हणजे हत्येपूर्वी तरुणीने अनेकांकडे मदतीची याचना केली होती. मात्र लोकांनी त्याचे व्हीडिओ बनवत वायरल केले होते. पण मदतीला कोणीही आलं नव्हतं.