नांदेडच्या प्रिंटिंग उद्योगाला ‘अच्छे दिन’, हजारो बेरोजगार हातांना काम
नांदेड : मराठवाड्यातील एक प्रमुख शहर म्हणून नांदेडची ओळख आहे. ऐतिहासिक शहर असलेल्या नांदेडमधील प्रिंटिंग व्यवसायाला सुमारे 120 वर्षाची परंपरा आहे. मात्र अत्याधुनिक मशीन नसल्यामुळे नांदेडचा प्रिंटिंग उद्योग हैदराबादच्या भरोशावर चालत असे. त्यामुळे या उद्योगाला उतरती कळा आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मेक इन महाराष्ट्र योजनेमुळे नांदेडच्या प्रिंटिंग उद्योगाला नवसंजीवनी मिळाली आहे. श्री गुरु […]
नांदेड : मराठवाड्यातील एक प्रमुख शहर म्हणून नांदेडची ओळख आहे. ऐतिहासिक शहर असलेल्या नांदेडमधील प्रिंटिंग व्यवसायाला सुमारे 120 वर्षाची परंपरा आहे. मात्र अत्याधुनिक मशीन नसल्यामुळे नांदेडचा प्रिंटिंग उद्योग हैदराबादच्या भरोशावर चालत असे. त्यामुळे या उद्योगाला उतरती कळा आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मेक इन महाराष्ट्र योजनेमुळे नांदेडच्या प्रिंटिंग उद्योगाला नवसंजीवनी मिळाली आहे.
श्री गुरु गोविंद सिंग महाराज यांच्या स्पर्शाने पावन अशी नांदेड शहराची ओळख आहे. निजामशाहीतही नांदेड हे महत्त्वाचं केंद्र राहिलेलं आहे. आजूबाजूच्या परभणी, लातूर, हिंगोली, वाशिमसह यवतमाळ जिल्ह्यातील उद्योगाला नांदेडमधूनच मालाचा पुरवठा होतो. याच नांदेडमध्ये अगदी 1898 सालापासून प्रिंटिंग उद्योग कार्यरत आहे. या मुद्रण उद्योगामध्ये 200 ते 250 व्यावसायिक आहेत. त्यातील काही मुद्रक आजही यंत्र सामग्री आणि कुशल कामगार सांभाळून आहेत. तर काही जण स्वतः स्क्रीनप्रिंटिंग, मिनी ऑफसेट, बाईडिंग, कटिंग, डी.टी.पी. आणि डिझायनिंगचे काम करतात. त्यातून फाईल, आरएक्स पॅड, शैक्षणिक स्टेशनरी, साहित्य निर्मिती, पुस्तके, नोट बुक्स, वेड्डींगकार्ड्स ही मुद्रीत उत्पादने तयार होतात.
प्रामुख्याने मुद्रण उद्योग हा बदलत्या काळानुसार बहुरंगी छपाईकडे जात आहे. नेमकी हीच अडचण नांदेड येथील उद्योग घटकांची होती. बहुरंगी मुद्रण प्रक्रियेतील पुढील महत्त्वाची यंत्र सामग्री एकाही उद्योग घटकाकडे नव्हती. यात प्रामुख्याने अत्याधुनिक यंत्रसामग्री येथील उद्योग घटकांकडे नसल्यामुळे मुद्रण क्षेत्रातील उद्योग, रोजगार हा 75 टक्के परावलंबी झाला होता. या सर्व अडचणींना नांदेड शहरातील उद्योग घटक सामोरे जात होते.
नांदेडमधले लघू उद्योजक देवदत्त देशपांडे यांनाही या अडचणीचा सामना करावा लागत होता. देशपांडे यांनी राज्य शासनाच्या एमएसआय-सीडीपी योजनेची माहिती घेतली आणि समूह घटक योजनेत आपल्या काही उद्योजक मित्रांना त्यांनी तयार केलं. राज्य सरकारच्या उद्योग विभागामार्फत समूह उद्योग अर्थात क्लस्टर योजनेअंतर्गत देशपांडे आणि त्यांच्या मित्रांनी दीड वर्ष मेहनत घेतली. त्यातून आता अविरत प्रिंटिंग क्लस्टर फाउंडेशन नावाचा समूह उद्योग उभा राहिलाय. या पूर्ण प्रकल्पाची एकूण किंमत सहा कोटी रुपयाच्या आसपास आहे. यात महाराष्ट्र सरकारने आपला 80 टक्के वाटा अनुदान म्हणून दिलाय. त्या अनुदानापोटी सरकारचे चार कोटी 79 लाख रुपये उद्योग उभारणीसाठी मिळाले आहेत. तर उद्योग समुहाने आपल्या 20 टक्के सहभागातून एक कोटी 20 लाख रुपये उभे केले. सरकारच्या या अनुदानामुळे आता नांदेडमध्ये प्रिंटिंग उद्योगाला लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक मशिनरी एकाच छताखाली आल्या आहेत.
प्रारंभी या प्रिंटिंग उद्योग समुहात एकूण 40 उद्योग लघू उद्योग घटक कार्यरत होते. त्यांची वार्षिक उलाढल 40 कोटी होती. तर 450 लोकांना रोजगार उपलब्ध होता. आता उद्योग घटकांची संख्या 78 झाली आहे. या उद्योगात सध्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कामगारांची संख्या 1000 च्या वर पोहोचली आहे. तसेच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ही उलाढाल 50 कोटीच्या घरात पोहोचली आहे. एका जॉबसाठी एक-एका उद्योग घटकाला 3 ते 4 दिवस लागत होते ते काम सीएफसीतील एकाच छताखाली असलेल्या सर्व यंत्र सामग्रीमुळे एकाच दिवसात मिळत आहे. त्यामुळे उद्योग घटकांना जलद सेवा तर मिळतच आहे, शिवाय वेळेचा अपव्यय टळल्यामुळे त्यांची उत्पादन क्षमतेत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नांदेडच्या प्रिंटिंग उद्योगातील उद्योजकांना अच्छे दीन आलेत असं म्हटलं तर वावगं ठरु नये.
या अविरत प्रिंटिंग क्लस्टर फाउंडेशनमुळे नांदेडमध्ये प्रिंटिंग व्यवसाय भरभराटीला आलाय. रोजगारात वाढ झाल्याने कुशल कामगारांना काम मिळायला लागलंय. आजघडीला या एका उद्योगामुळे एकट्या नांदेडमध्ये एक हजारपेक्षा जास्त घरात पैसा खेळू लागलाय. मुख्यमंत्र्यांच्या मेक इन महाराष्ट्र या योजनेचे नांदेडमधले हे चित्र प्रचंड आशादायी असंच आहे. तीव्र स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर अन्य लघू उद्योजकांनीही नांदेडच्या या समूह उद्योगाचे अनुकरण करायला हवं.