Nashik | टंचाईग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; पालखेड क्षेत्राला सिंचनाचे दुसरे आवर्तन मिळणार
येवला तालुक्यासह परिसरात विहिरींनी तळ गाठला असून, पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सिंचनाचे दुसरे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली होती.
नाशिकः नाशिकला (Nashik) यावर्षी तुफान पावसाने झोडपले. गोदावरीला चक्क पाच पूर आले. मात्र, तरीही अनेक भागाला मार्चच्या पहिल्याच आठवड्यात टंचाईचे चटके बसत आहेत. पालखेड डावा कालवा लाभ क्षेत्रात पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. हेच पाहून येत्या 10 मार्चपासून पालखेड डावा कालव्याचे सिंचनाचे दुसरे द्या, असे आदेश राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या आवर्तनामुळे शेतकऱ्यांचा पिकांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
किती दिवस लाभ?
येवला तालुक्यासह परिसरात विहिरींनी तळ गाठला असून, पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सिंचनाचे दुसरे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली होती. त्यावर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दहा मार्च पासून पालखेड डावा कालव्याचे दुसरे आवर्तन व ते संपल्यानंतर आकस्मित आरक्षणाचे आवर्तन त्यास जोडून देण्याचे आदेश सबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. हे आवर्तन महिनाभर सुरू राहणार असून, पालखेड डावा कालवा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न त्यामुळे मार्गी लागणार आहे. आकस्मित आरक्षणात समाविष्ट असलेले बंधारे आकस्मित आवर्तनातून भरले जाणार आहे. यातून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा शेतीसोबतच जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
21 योजनांचा मार्ग मोकळा
नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यातील देवनासह 21 योजनांना प्रशासकीय मान्यता मिळूनही कोरोनाच्या निर्बंधांमुळे 23 मे 2021 रोजी महामंडळाकडून राज्यातील सर्व योजनांच्या निविदा प्रक्रियेस स्थगिती देण्यात आलेली होती. अखेर ही स्थगिती महामंडळाने उठविली असून, येवला तालुक्यातील देवना साठवण तलावासह 21 योजनांचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व योजनांसाठी शासनाकडून 28 कोटी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर असून, त्याची निविदा प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे.
41 गावे योजनेला हिरवा कंदिल
येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण व दुष्काळी पट्ट्यातील राजापूरसह 41 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकडून तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी तसेच धुळगावसह 18 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीत राजापूरसह या पाणीपुरवठा योजनेस मान्यता देण्यात आली आहे. धुळगावसह 18 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.
इतर बातम्याः
ऐतिहासिक नाशिकला स्मार्ट सिटीचा चूड; गोदाघाट उद्धवस्त करून मंदिरे तोडली, आंदोलन पेटणार!
युक्रेनमधले 16 विद्यार्थी सुखरूप परतले; नाशिककरांच्या आनंदाला पारावार नाही, वाजत-गाजत स्वागत!