Navi Mumbai Corona | नवी मुंबईत ‘मिशन झिरो’, महिन्याभरात 51 हजार अँटिजेन टेस्ट
16 ऑगस्टपर्यंत एका महिन्यात 51 हजार 323 व्यक्तींची अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे
नवी मुंबई : ‘मिशन ब्रेक द चेन’ व्दारे नवी मुंबई महापालिका (Navi Mumbai Mission Zero) आयुक्त अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून कोरोना बाधितांचा जलद शोध घेऊन त्यांच्यापासून होणारा संभाव्य प्रसार टाळण्याच्या दृष्टीने घरोघरी मास स्क्रिनिंग करण्यात येत आहे. त्यासोबतच अर्ध्या तासात रिपोर्ट प्राप्त होणाऱ्या अँटिजेन टेस्टिंगवर भर दिला जात आहे. 16 जुलैपासून मोफत अँटिजेन टेस्टिंग सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी 22 अँटिजेन टेस्टिंग केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. तसेच सोसायटी, वसाहती याठिकाणी जाऊन अँटिजेन टेस्टिंग मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. याव्दारे 16 ऑगस्टपर्यंत एका महिन्यात 51 हजार 323 व्यक्तींची अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे (Navi Mumbai Mission Zero).
22 ठिकाणी अँटिजेन टेस्टिंग केंद्रं
22 ठिकाणी अँटिजेन टेस्टिंग केंद्रं सुरु करुनही अनेक व्यक्ती केंद्रावर जाऊन टेस्टिंग करण्याचे टाळताना दिसतात, हे लक्षात घेऊन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘अँटिजेन टेस्ट आपल्या घरापर्यंत’ ही संकल्पना नजरेसमोर ठेवली. यासाठी ‘मिशन झिरो नवी मुंबई’ उपक्रम हाती घेण्यात आला. या अंतर्गत 6 जनजागृतीपर प्रचाररथ आणि 34 मोबाईल अँटिजेन टेस्टिंग व्हॅन कार्यान्वित करण्यात आल्या आणि सोसायटी, वसाहतींमध्ये जाऊन अँटिजेन टेस्ट्स करण्यास सुरुवात करण्यात आली.
अँटिजेन टेस्टमध्ये ज्या नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. मात्र, त्यांच्यामध्ये कोरोना सदृष्य लक्षणे आढळत आहेत, अशा व्यक्तींची लगेच आर.टी.-पी.सी.आर. टेस्ट करण्यात येत आहे. याशिवाय कोरोनाबाधित व्यक्तीच्या अतिनिकटच्या संपर्कातील व्यक्ती (High Risk Contact) तसेच ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय व किडनीचे विकार असे इतर आजार असणाऱ्या कोमॉर्बिड व्यक्ती यांचीही आर.टी.-पी.सी.आर. टेस्ट करण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे अशा व्यक्तींची आर.टी-पी.सी.आर. टेस्ट केल्यानंतर त्या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त होईपर्यंत त्यांना विलगीकरण (Isolation) करून ठेवण्यात येत आहे. तशा प्रकारचे निर्देश 22 अँटिजेन टेस्ट केंद्र प्रमुखांना आणि रुग्णालयांना देण्यात आलेले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेची स्वत:ची प्रतिदिन 1000 टेस्टिंग क्षमता असणारी अद्ययावत संपूर्ण ऑटोमॅटिक आर.टी.-पी.सी.आर. लॅब नेरुळ येथील महानगरपालिका रुग्णालयात कार्यान्वित झालेली असून येथून 24 तासांच्या आत रिपोर्ट मिळत आहेत (Navi Mumbai Mission Zero).
महिन्याभरात 51323 अँटिजेन टेस्ट्स
अशाप्रकारे कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जलद रुग्णशोध करणे आणि त्याचे विलगीकरण करणे याकरिता टेस्टिंगच्या संख्या वाढीवर भर देण्यात आला. 16 जुलै ते 31 जुलै या कालावधीत 16320 अँटिजेन टेस्ट्स करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे 1 ऑगस्टपासून 16 ऑगस्टपर्यंत 35003 अँटिजेन टेस्ट्स करण्यात आलेल्या आहेत. अशाप्रकारे एकूण 51323 अँटिजेन टेस्ट्स करण्यात आलेल्या आहेत. या 51323 अँटिजेन टेस्टमधून 6629 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
यामध्ये 10 ऑगस्टपासून ‘मिशन झिरो नवी मुंबई’ उपक्रमांतर्गत सोसायट्या, वसाहतींमध्ये जाऊन अँटिजेन टेस्टिंगला सुरुवात करण्यात आली असून 16 ऑगस्टपर्यंत 69 सोसायट्यांमध्ये 6999 व्यक्तींच्या अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यामधील 325 टेस्ट्स पॉझिटिव्ह आल्या आहेत.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वत:च्या आर.टी.-पी.सी.आर. लॅबमध्ये टेस्टिंगला सुरुवात करण्यात आली असून 16 ऑगस्टपर्यंत 3257 टेस्ट्स करण्यात आलेल्या आहेत. त्यामधील 865 टेस्ट्सचा रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेला आहे.
कोरोना बाधितांचा लवकरात लवकर शोध घेऊन कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला खीळ घालणे. ज्येष्ठ नागरिक आणि कोमॉर्बिड व्यक्तींकडे विशेष लक्ष देत मृत्यूदर कमी करणे हे मुख्य लक्ष्य नजरेसमोर ठेवून टेस्टिंगच्या संख्यावाढीकडे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर विशेष लक्ष देत असून दररोज वैद्यकीय अधिकारी आणि विभाग अधिकारी यांच्याशी दररोज संध्याकाळी वेब संवाद साधत प्रत्येक गोष्टीचा बारकाईने आढावा घेत आहेत.
कोव्हिड-19 च्या लढाईतील उद्दिष्ट्ये सफल होण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अतिशय मोलाचे असून प्रत्येक नागरिकाने ‘मी पण कोव्हिड योध्दा’ या भूमिकेतून स्वयंशिस्तीचे पालन करावे. तसेच, लक्षणे असल्यास ती न लपवता आपली मोफत अँटिजेन टेस्ट करुन घ्यावी, असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे (Navi Mumbai Mission Zero).
नवी मुंबईतील दुकानदारांना दिलासा, दुकानं दररोज उघडण्यास आयुक्तांची परवानगीhttps://t.co/z83yIcKNK8#NaviMumbai
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 18, 2020
संबंधित बातम्या :
सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांची अचानक बदली, डॉ. संजय मुखर्जी यांची वर्णी