दहा बाय दहाच्या खोलीत शौचालयाचीही अडचण; चाकरमान्यांना मुंबईतून कोकणात परतू द्या, आमदारांचं पत्र

| Updated on: Mar 27, 2020 | 9:28 AM

नोकरीनिमित्त मुंबईत गेलेल्या चाकरमान्यांना कुटुंबासह कोकणात येण्याची परवानगी द्यावी, असं पत्र राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं. (MLA Shekhar Nikam Letter to CM)

दहा बाय दहाच्या खोलीत शौचालयाचीही अडचण; चाकरमान्यांना मुंबईतून कोकणात परतू द्या, आमदारांचं पत्र
Follow us on

रत्नागिरी : ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या चाकरमान्यांसाठी राष्ट्रवादीचे रत्नागिरीतील आमदार शेखर निकम धावून आले आहेत. दहा बाय दहाच्या खोलीत शौचालयाचीही अडचण होते. त्यामुळे चाकरमान्यांना मुंबईतून कोकणात परतू द्या, असं पत्र निकम यांनी सरकारला लिहिलं आहे. (MLA Shekhar Nikam Letter to CM)

चाळ संस्कृतीत दहा बाय दहाच्या खोलीत चाकरमान्याला राहणे अशक्य आहे. अनेक ठिकाणी शौचालयसुद्धा सार्वजनिक आहेत. त्यामुळे अनेक चाकरमान्यांचे इथून सुटकेसाठी फोन येत आहेत. नोकरीनिमित्त मुंबईत गेलेल्या चाकरमान्यांना कुटुंबासह कोकणात येण्याची परवानगी द्यावी, असं पत्र आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिले आहे. शेखर निकम हे चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

मुंबईसह विरार, नालासोपारा भागात मोठ्या प्रमाणात कोकणातील चाकरमानी राहतात. मुंबईत उष्णता वाढत चालल्यामुळे एका खोलीत चार ते पाच जणांना राहणे अवघड झाले आहे. लहान मुलं खूप रडतात, चाकरमान्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे, असं त्यांनी लिहिलं आहे.

हेही वाचा : कोरोनाविरोधी लढाईत शिवसेना-राष्ट्रवादीचा मदतीचा हात, आमदार-खासदारांचे एक महिन्याचे वेतन सहाय्यता निधीला

कोकणातील वाडी संस्कृती सक्षम असल्याने एकदा निर्णय झाला, की कोणी विनाकारण घराबाहेर पडणारही नाही आणि एकत्र जमणारही नाही. चाकरमान्यांना घरी जाण्यासाठी दोन दिवसांची परवानगी द्यावी. प्रत्येक तालुक्यातील चेकनाक्यावर तपासणी करुन घरी जाण्याची परवानगी दिली, तर अनेक कुटुंब सुखरुप घरी जाऊन आपापली काळजी घेतील, अशी ग्वाही शेखर निकम यांनी पत्रातून दिली आहे. (MLA Shekhar Nikam Letter to CM)

‘कोरोना’शी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या काळात केवळ जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठीच सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर पडण्यास मुभा आहे. 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊनचा कालावधी असेल.

जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यास जायला पोलिसांची कोणतीही आडकाठी नाही. परंतु किमान तीन फुटांचे अंतर आणि तोंडाला मास्क लावण्याची काळजी प्रत्येकाने घ्यावी असं वारंवार बजावून सांगितलं जात आहे. (MLA Shekhar Nikam Letter to CM)