भाजपसोबत जाण्याच्या पत्रावर कुणाकुणाच्या सह्या होत्या; सुनील तटकरे म्हणाले गौप्यस्फोट केला तर…
‘लोकसभेचा महासंग्राम’ या टीव्ही9 मराठीच्या कॉनक्लेव्हमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अनेक गौप्यस्फोट केले. काही महत्वांच्या विषयावरही त्यांनी भाष्य केलं. तसेच त्यांनी संजय राऊतांवरही टीकास्त्र सोडलं.

मुंबई | 1 मार्च 2024 : शरद पवार विरुद्ध दादा असा मुद्दा नाही. पक्षातील लोकांना वाटत होतं आपण सत्तेत सहभागी व्हावं. एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले, तेव्हा उद्धव ठाकरे यांचं सरकार जाणार असं वाटत होतं. त्यावेळी विधीमंडळात राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक झाली. त्यावेळी शरद पवार यांना पत्र लिहून भाजपमध्ये जायचं ठरलं. हे २०२२ मध्ये ठरलं. तेव्हा सह्या केल्या होत्या. राजकारणातील एवढी मोठी समजणारी माणसं त्या बैठकीत काहीच निर्णय झाला नसताना कशी सह्या करतील? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विचारला. त्या पत्रात सर्व नमूद केलेलं होते, चर्चा झालेली होती, त्यानंतरर सह्या झाल्या. सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी पक्षनेतृत्वाने पाठिंबा द्यावा, असा पत्राचा आशय होता. चर्चेची सुरुवात कुणी केली, कोण काय बोललं कुणी काय वाक्य वापरली हे मी गुलदस्त्यात ठेवतो, असे तटकरे म्हणाले. ‘लोकसभेचा महासंग्राम’ या टीव्ही9 मराठीच्या कॉनक्लेव्हमध्ये ते बोलत होते.
आम्ही कुठे जावं हे ठरवणारे संजय राऊत कोण ?
आम्ही कुठे जावं हे ठरवणारे संजय राऊत कोण ? त्यांच्या पक्षातील लोकच त्यांचं ऐकत नाही. आम्ही कसे ऐकणार ? असा खडा सवालही त्यांनी विचारला. मला राऊत यांच्याबद्दल आदर आहे. ते आमच्या जिल्ह्यातील आहेत. प्रतिथयश संपादक आहेत. त्यांचं लिखाण चांगलं आहे. पण त्यांच्या बोलण्यामुळे आमचं जाणं थांबलं असं म्हणणं चुकीचं आहे. त्यांना त्यांची माणसं थांबवता आली नाहीत, ते आम्हाला कसे थांबवतील ? शिवसेनेतील एका तरी व्यक्तीला राऊतांनी थांबवलं का ? संजय राऊत त्यांच्या स्टाईलने बोलत असतात. पण आमच्या पक्षात काय चर्चा झाली हे सांगायला ते आमचे प्रवक्ते आहेत का, असा खोचक सवालही तटकरे यांनी विचारला.
ईडीच्या भीतीने गेले असं पवार म्हणाले
जे लोक भाजपकडे गेले ते ईडीच्या भीतीने, असं शरद पवार म्हणाले होते. त्याबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यावर तटकरेंनी त्यांच मत स्पष्टपणे मांडलं. शरद पवार यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. ते सहा दशके राजकारणात आहेत. त्यांचा वरदहस्त आम्हाला होता. पण त्यांच्या विधानावर मी कोणतंही भाष्य करणार नाही, असे ते म्हणाले.