FARMER PROTEST | दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा 12वा दिवस, असं आंदोलन तुम्ही कधी पाहिलं का?
दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचे काही खास वैशिष्ट्ये आहे. या आंदोलनात पुस्तकालय पाहायला मिळत आहे. आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी आपल्यासोबत 6 महिने पुरेल इतका धान्यसाठा आणला आहे.
नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 12 वा दिवस आहे. पंजाब, हरियाणा सह देशभरातून हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. केंद्रानं मंजूर केलेले तिनही कृषी कायदे रद्द करावे अशी या आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे. या आंदोलनात तरुण, वृद्द, महिला, मुली आणि लहान मुलंही सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या 12 दिवसांपासून सुरु असलेलं हे आंदोलन कसं पुढे जात आहे? आंदोलकांच्या जेवणाची सोय काय? दिल्लीसारख्या ठिकाणी कडाक्याच्या थंडीत हे आंदोलन कसे तग धरुन आहेत? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतील. तर या आंदोलनाची काही खास वैशिष्ट्येच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Some special features of the farmers’ movement in Delhi)
आंदोलनात पुस्तकालय!
12 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गाजीपूर प्लायओव्हरवर रविवारी एक वेगळच चित्र पाहायला मिळालं. इथं अस्थायी स्वरुपात एक पुस्तकालय सुरु करण्यात आलं आहे. रविवारी आंदोलक शेतकऱ्यांनी या पुस्तकालयावर मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. आंदोलकांमधीलच काही युवकांनी हे पुस्तकालय सुरु केलं आहे. यामध्ये सामाजिक प्रश्नांसह क्रांतीकारकांच्या आयुष्यावर आधारित पुस्तकं पाहायला मिळाली. महात्मा गांधी, शहीद भगत सिंह आणि करतार सिंह सराभा यांची पुस्तकं मोठ्या प्रमाणात दिसून आली. त्यासोबतच अर्जेंटीनेचे मार्क्सवादी क्रांतिकारक चे ग्वेरा आणि रशियाचे लेखक मॅक्सिस गोर्की यांचीही अनुवादित पुस्तकं इथं विक्रीसाठी आहेत.
उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची मुलगी असणाऱ्या शालू पवार आणि तिच्या सहकाऱ्यांनी आपल्या विकल्प मंच या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन स्थळावर हे पुस्तकालय सुरु केलं आहे. या पुस्तकालयातील एका पुस्तकात केंद्र सरकारच्या कृषी कायद्यामुळे होणाऱ्या परिणामांची सविस्तर माहिती देणारी एक पुस्तिकाही ठेवण्यात आली आहे. विकल्प मंच हा शेतकरी आणि सामाजिक प्रश्नांवरील साहित्याचं प्रकाशन करतं. त्यामुळे या शेतकरी आंदोलनात सहभागी होत, शेतकऱ्यांना एका विशिष्ट कार्याप्रती प्रेरित करण्यासाठी हे पुस्तकालय स्थापल्याचं शालू पवार हिने सांगितलं.
आंदोलकांनी सरकारी जेवण नाकारलं
शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारमधील मंत्री आणि शेतकरी संघटनांमध्ये सातत्यानं बैठका पार पडत आहेत. 3 डिसेंबरलाही अशीच एक बैठक दिल्लीतील संसदभवनात पार पडली होती. त्यावेळी सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये एका-एका मुद्द्यावर सविस्तर चर्चा सुरु होती. या बैठकीला केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, रेल्वेमंत्री पियुष गोयल उपस्थित होते. दुपारी जेवणासाठी बैठक स्थगित करण्यात आली. तेव्हा सरकारकडून शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना जेवणाचं निमंत्रण देण्यात आलं. मात्र, शेतकऱ्यांनी सरकारचं जेवण आणि चहादेखील नाकारला होता. शेतकऱ्यांना सोबत आणलेलं जेवणच घेतलं.
#WATCH | Delhi: Farmer leaders have food during the lunch break at Vigyan Bhawan where the talk with the government is underway. A farmer leader says, “We are not accepting food or tea offered by the government. We have brought our own food”. pic.twitter.com/wYEibNwDlX
— ANI (@ANI) December 3, 2020
पोलिस आणि पत्रकारांनाही आंदोलकांकडून जेवण
दिल्लीच्या आंदोलनात सहभागी झालेले आंदोलकांनी सरकारचं जेवण किंवा चहाच नाकारला नाही, तर हे शेतकरी आंदोलनाच्या बातम्या करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना आणि सुरक्षेसाठी आलेल्या पोलिसांनाही जेवण देत आहेत. जवळपास 6 महिन्यापर्यंत पुरेल इतका अन्नधान्याचा साठा या आंदोलक शेतकऱ्यांनी आणला आहे. स्वयंपाकाच्या सर्व वस्तू, गॅस सिलिंडर अशा अनेक गोष्टी या शेतकऱ्यांनी सोबत आणलंय. कायदे रद्द करण्याच्या मागण्यासाठी आम्हाला 6 महिन्यांपासून अधिक काळ राहण्याचीही आमची तयारी असल्याचं हे आंदोलन सांगत आहेत. आमच्यासोबत संपूर्ण दिल्लीलाही आम्ही जेवण घालू शकतो, एवढी आमची ताकद असल्याचं हे शेतकरी आवर्जुन सांगतात.
संबंधित बातम्या:
Bharat Bandh : उद्या नाही मिळणार दूध-फळ आणि भाज्या, फक्त ‘या’ सेवा राहणार सुरू
Farmers Protest | शेतकऱ्यांसाठी 30 खेळाडू मैदानात, राष्ट्रपतींकडे पुरस्कार परत करणार!
Some special features of the farmers’ movement in Delhi