VIDEO : शेणानं सारवलेल्या भिंती, पंगतीत जेवण, गावाचा अस्सल अनुभव देणारं अनोखं हॉटेल
सध्या फूड इंडस्ट्रीमध्ये आपण पाहिले असेल वेगवेगळ्या थिम्सची हॉटेल्स (Satbara hotel kolhapur) सुरु झालेली आहेत.
कोल्हापूर : सध्या फूड इंडस्ट्रीमध्ये आपण पाहिले असेल वेगवेगळ्या थिम्सची हॉटेल्स (Satbara hotel kolhapur) सुरु झालेली आहेत. अशाच एका हटके थिमचे हॉटेल कोल्हापुरात सुरु झाले आहे. या हॉटेलचे वैशिष्ट म्हणजे चक्क शेणाने हे हॉटेल सारवलेले आहेत. आतापर्यंत आपण शेणाने सारवलेली घरं पाहिली असतील पण शेणाने सारवलेले हॉटेल (Satbara hotel kolhapur) नव्याने सुरु केले आहे. सध्या कोल्हापुरात या हॉटेलची चर्चा सुरु झाली आहे.
शेणानं सारवलेली कंपाउंडची भिंत, आत नजरेस पडणारे टांगलेले कंदील, बाजूलाच एक बैलगाडी आणि विहीर हे सगळं पाहून तुम्हाला एखाद्या दुर्गम भागातील खेड्यात आल्याचा भास होईल. पण हॉटेलमध्ये ही पूर्ण थिम तयार करण्यात आली आहे.
कोल्हापूरजवळील गड मुडशिंगी गावाजवळ हे हॉटेल आहे. या हॉटेलचे नाव सातबारा हॉटेल असं आहे. हॉटेलचं नाव जसं वेगळं तसंच इथलं वातावरण देखील वेगळं आहे. या हॉटेलमध्ये ग्रामीण भागातील वातावरणाबरोबर तुम्हाला आस्वाद घेता येतो. दहा प्रकारच्या भाकऱ्या आणि कोल्हापुरी तांबडा-पांढरा रश्श्याबरोबरच काळ्या पिवळा रस्सा आणि मटण येथे खायला मिळेल. शिवाय इथं तुम्हाला डायनिंग टेबलची व्यवस्था नाही तर जमीनीवर धनगरी घोंगड्यावर पंगतीत बसावे लागते. या हॉटेलची सुरुवात 11 महिन्यापूर्वी केली आणि अवघ्या काही महिन्यात हे हॉटेल चर्चेचा विषय बनले आहे.
“महाराष्ट्राची संस्कृती टिकली पाहिजे खेड्यांची ओळख लहान मुलांना झाली पाहिजे यासाठी ही अनोखी संकल्पना राबवली”, असं हॉटेल मालक राहुल सावंत सांगतात.
आधीच कोल्हापूरच्या तांबड्या पांढऱ्या रश्श्याची चव चाखायला येणाऱ्या खवय्यांना इथं काळया पिवळ्या मटणाचा देखील आस्वाद घेता येत आहे. धनगरी ताटातील हे झणझणीत मटण खाताना खवय्यांना घाम फुटल्याशिवाय राहत नाही. मात्र तरीही काहीतरी वेगळं अनुभवायला मिळत असल्याने ग्राहक समाधान व्यक्त करत आहेत.
VIDEO : शेणानं सारवलेल्या भिंती, पंगतीत जेवण, गावाचा अस्सल अनुभव देणारं अनोखं हॉटेल pic.twitter.com/wCPGOzQqw0
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 1, 2020