राम जन्मभूमीत मोदींच्या हस्ते पारिजातकाचे वृक्षारोपण, प्राजक्ताच्या झाडाचे महत्त्व काय?
पारिजातकाचे झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणले. हे झाड कोठे लावावे यावरून सत्यभामा आणि रूक्मिणी यांच्यात वाद झाला, अशी आख्यायिका आहे
लखनऊ : अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा अवघ्या काही मिनिटांवर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12 वाजून 44 मिनिटांच्या मुहूर्तावर भूमिपूजन होईल. त्याआधी राम जन्मभूमी परिसरात नरेंद्र मोदींनी पारिजातकाचे वृक्षारोपण केले. या भूमिपूजन सोहळ्याचा भाग झालेल्या पारिजातकाचे महत्त्व आणि वैशिष्ट्य काय आहे, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (Night flowering jasmine Parijatak flower significance)
पारिजातक किंवा प्राजक्ताचे झाड. हा वृक्ष दिसायला अत्यंत लोभस. प्राजक्ताची फुले भगवान श्रीकृष्ण यांच्या पूजेमध्ये वाहिली जातात. या मोहक आणि सुवासिक फुलांना ‘हरसिंगार’ (हरीचा शृंगार) असेही म्हणतात. हिंदू धर्मात हे झाड फार महत्वाचे मानले जाते. एखाद्या व्यक्तीला आलेला थकवा केवळ पारिजातकाला स्पर्श करुन नाहीसा होतो, अशीही धारणा आहे.
हेही वाचा : बाबरी मशिदीवरुन ओवेसींचे ट्वीट, तर संजय राऊत यांच्या फोटोतून भावना
पारिजातकाचे झाड दहा ते पंचवीस फूट उंचीपर्यंत वाढते. या झाडाची एक खास गोष्ट म्हणजे त्याला मोठ्या प्रमाणावर फुले येतात. पारिजातकाच्या फुलांचा रंग हा पाकळ्या पांढऱ्याशुभ्र रंगाच्या मात्र देठ आणि पाकळीची मधली बाजु ही भगव्या रंगाची असते. एका दिवसात कितीही फुले तोडली, तरी दुसर्या दिवशी पारिजातक पुन्हा फुलांनी मढलेला असतो.
हे झाड विशेषत: मध्य भारत आणि हिमालयातील सखल डोंगरावर वाढते. पारिजातकाचे फूल हे पश्चिम बंगालचे ‘राज्य फूल’ आहे. जगात याच्या केवळ पाच प्रजाती आढळतात.
लक्ष्मी देवीला प्रिय फूल
पारिजातकाची फुले लक्ष्मी देवीला खूप प्रिय आहेत. लक्ष्मी देवतेला प्रसन्न करण्यासाठी पारिजातकाची फुले अर्पण केली जातात. या झाडावरुन पूजेसाठी फुले तोडणे निषिद्ध मानतात. केवळ जमिनीवर पडलेली फुलेच पूजेसाठी वापरावी, असे म्हटले जाते. 14 वर्षांच्या वनवासात सीता पारिजातकाच्या फुलांनी स्वत:चा साजशृंगार करायच्या, असे म्हणतात. (Night flowering jasmine Parijatak flower significance)
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
पारिजातकाचे झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणले. हे झाड कोठे लावावे यावरून सत्यभामा आणि रूक्मिणी यांच्यात वाद झाला. कृष्णाने ते सत्यभामाच्या अंगणी अशा ठिकाणी लावले की फुले उमलल्यावर रुक्मिणीच्या अंगणात पडावे, अशीही आख्यायिका आहे.
उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील पारिजातकाचा वृक्ष हा महाभारताच्या काळातील असल्याचे मानले जाते. तो सुमारे 45 फूट उंच आहे. तो पारिजातकाचा वृक्ष समुद्र मंथनातून उगम पावला, इंद्राने तो आपल्या बागेत लावला होता. अज्ञातवासात असताना कुंतीने पारिजातकाच्या फुलाने शिवशंकराची उपासना करण्याची इच्छा व्यक्त केली. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुनाने हे झाड स्वर्गातून आणले आणि तिथे लावले. तेव्हापासून या झाडाची पूजा केली जात आहे.
औषधी गुणधर्म
पारिजातक हे औषधी गुणांसाठीही ओळखले जाते. दररोज त्याची एक बी घेतल्याने मूळव्याध बरा होतो, असे म्हणतात. त्याची फुलं हृदयासाठी चांगली मानली जातात. पारिजातकाच्या फुलांचा रस घेतल्यास हृदयरोग टाळता येतो. फुले कुटून मधात मिसळल्यास कोरडा खोकलाही बरा होतो. पारिजातकाच्या पानामुळे त्वचेशी संबंधित आजारही बरे होतात, असे मानले जाते.
अयोध्या राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे लाईव्ह अपडेट इथे वाचा
या झाडाची 4-5 ‘हिरवी’ पाने घेऊन त्याची चटणी करुन त्याला 200 मिली पाण्यात टाकून ते पाणी 50 मिली राहेपर्यंत उकळावे. या पाण्याचे सकाळी काहीही न खातापिता सेवन केले असता, शरीरातील सांध्यांचे दुखणे कमी होण्यास मदत होते, चिकुनगुनिया मुळे उद्भवणाऱ्या सांधेदुखीवर तसेच गुडघेदुखीवर (आर्थरायटिस) देखील याचा उपयोग होतो. मलेरिया व सायटिका या रोगांवरदेखील हे उपयोगी आहे. (Night flowering jasmine Parijatak flower significance)