‘निर्भया’ला अखेर न्याय, सूर्योदयापूर्वी नराधमांचा अस्त, चारही दोषींना फाशी
दोषींना फाशी मिळाल्यानंतर आशादेवी यांनी निर्भयाच्या फोटोला मिठी मारत 'शेवटी तुला न्याय मिळाला' असे उद्गार काढले. (Nirbhaya Verdict Convicts Hanged)
नवी दिल्ली : दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात बळी पडलेली निर्भया आणि तिच्या कुटुंबियांना अखेर 2650 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर न्याय मिळाला आहे. चारही दोषी विनय कुमार शर्मा, पवन कुमार गुप्ता, मुकेश सिंह आणि अक्षय कुमार सिंह यांना आज (20 मार्च 2020) पहाटे 5.30 वाजता फासावर लटकवण्यात आले. (Nirbhaya Verdict Convicts Hanged)
निर्भयाच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवल्याच्या वृत्तावर तिहार तुरुंगाचे महासंचालक संदीप गोयल यांनी शिक्कामोर्तब केलं. तिहार जेलमधील तीन क्रमांकाच्या तुरुंगात चौघांना फाशी देण्यात आली. फाशीनंतर डॉक्टरांनी चारही दोषींची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. यावेळी तिहार तुरुंगाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
निर्भयाच्या आई आशादेवी यांनीही समाधानाची भावना व्यक्त केली. दोषींना फाशी मिळाल्यानंतर आशादेवी यांनी निर्भयाच्या फोटोला मिठी मारत ‘शेवटी तुला न्याय मिळाला’ असे उद्गार काढले.
2012 Delhi gang-rape case: All 4 death row convicts have been hanged at Tihar jail. pic.twitter.com/xOFJirPf8A
— ANI (@ANI) March 20, 2020
‘शेवटी त्यांना फाशी देण्यात आली. हा एक दीर्घकाळ चाललेला संघर्ष होता. आज आम्हाला न्याय मिळाला, हा दिवस देशातील मुलींना समर्पित आहे. मी न्यायपालिका व सरकार यांचे आभार मानते.’ असं आशादेवी म्हणाल्या. (Nirbhaya Verdict Convicts Hanged)
‘आमची मुलगी आता या जगात नाही आणि ती परतही येणार नाही. ती आम्हाला सोडून गेल्यानंतर आम्ही हा लढा सुरु केला होता, हा संघर्ष तिच्यासाठी होता पण आम्ही आमच्या लेकींसाठी भविष्यात हा लढा सुरु ठेवू’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
#WATCH Asha Devi, mother of 2012 Delhi gang rape victim says, “As soon as I returned from Supreme Court, I hugged the picture of my daughter and said today you got justice”. pic.twitter.com/OKXnS3iwLr
— ANI (@ANI) March 20, 2020
निर्भया बलात्कार प्रकरण
राजधानी दिल्लीत चालत्या बसमध्ये सहा नराधमांनी 16 डिसेंबर 2012 रोजी एका तरुणीवर पाशवी बलात्कार केला होता. गँगरेपच्या या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. नराधमांनी केलेल्या अत्याचारांमुळे तरुणीची प्रकृती बिकट झाली होती. देशभरातून तिच्यासाठी प्रार्थना केल्या जात होत्या, मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.
नऊ महिन्यांनंतर सप्टेंबर 2013 मध्ये कनिष्ठ कोर्टाने दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. मार्च 2014 मध्ये उच्च न्यायालयाने आणि मे 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. शेवटच्या क्षणापर्यंत आरोपींनी शिक्षा रद्द करण्याचा खटाटोप केला, मात्र सुदैवाने तो व्यर्थ ठरला.
22 जानेवारी, 1 फेब्रुवारी आणि 3 मार्च रोजी दोषींना फासावर चढवण्यासाठी काढण्यात आलेले ‘डेथ वॉरंट’ कायद्यातील पळवाटांमुळे निष्प्रभ ठरले होते. राष्ट्रपतींनी सर्व दोषींच्या दयायाचना फेटाळून लावल्यानंतर प्रदीर्घ काळापासून कायद्यातील पळवाटांचा फायदा उठवून फाशीची शिक्षा टाळण्याचे सर्व कायदेशीर पर्याय संपले. दिवसभरात दोषींच्या सहा याचिका फेटाळण्यात आल्या.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पवन गुप्ता आणि अक्षय ठाकूर यांची दुसरी दया याचिका फेटाळली. त्याला आव्हान देणारी अक्षयची याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. पवन गुप्ताने दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, तर 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर सामूहिक बलात्कार आणि हत्येची घटना घडली तेव्हा आपण दिल्लीत नव्हतो, असा दावा करणारी मुकेश सिंहची याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
(Nirbhaya Verdict Convicts Hanged)