महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण किती?, राजेश टोपे म्हणतात…
कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह नसल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे (Corona infection in Maharashtra).
मुंबई : कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह नसल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे (Corona infection in Maharashtra). आतापर्यंत सर्वच विमानतळावर 1 लाख 18 हजार 267 प्रवाशांची स्क्रिनिंग तपासणी करण्यात आली आहे.
राजेश टोपे म्हणाले, “आत्तापर्यंत 1 लाख 18 हजार 267 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 280 लोकांना याची लक्षणं आढळली. त्या आधारे या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रत्येकाच्या दोन स्तरावरील चाचण्या घेण्यात आल्या. यापैकी 273 जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत, तर 7 जणांच्या चाचण्यांचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.
महाराष्ट्रात एकूण 8 लोक वेगवेगळ्या शहरांमध्ये रुग्णालयात दाखल आहेत. यात मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये 3, ठाणे येथील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये 1, नागपूरच्या आयजीएमसीमध्ये 1, पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये 3 यांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यात 119 स्वतंत्र खाटा (Isolation Beds), महानगरपालिकेत 97, मेडिकल कॉलेजमध्ये 266, खासगी हॉस्पिटलमध्ये 20 असे एकूण 502 आयसोलेशन बेड तयार करण्यात आले आहेत.
गरज असेल तेव्हा तात्काळ व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावेत म्हणून 82 व्हेंटिलेटर वेगळे काढून ठेवण्यात आले आहेत. 9 हजार 801 प्रायव्हेट प्रोटेक्शन किट, 2 लाख एन 95 स्पेशल मास्क उपलब्ध आहेत. तसेच पेशंट आणि नातेवाईकांसह अन्य लोकांनी वापरता यावेत यासाठी ट्रिपल लेअर 15 लाख मास्क उपलब्ध करुन ठेवण्यात आले आहेत.
जनजागृती व्हावी म्हणून आजपासून सगळीकडे रेडिओ जिंगल सुरु होणार असल्याची माहितीही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सगळ्या जिल्ह्यांमध्ये होर्डिंग लावण्याचं काम झालं आहे. टीव्ही स्पॉटच्या ठिकाणी मराठीत डबिंग करुन सगळ्या महत्वाच्या प्रिमीअम वेळेत सर्वच महत्वाच्या चॅनेलवर कोरोना संदर्भात माहिती देण्याचं काम होणार आहे, अशीही माहिती टोपे यांनी दिली. तसेच सिनेमागृहात जनजागृती करण्याचं काम सुरु असून सर्व पद्धतीने महाराष्ट्र शासन दक्ष असल्याचं राजेश टोपे यांनी नमूद केलं.
संबंधित बातम्या :
Corona : इटलीसाठी रविवार ठरला घातवार, चीनपेक्षा सहापट बळींची नोंद
Corona infection in Maharashtra