मटणाचा भाव चिकनच्या दसपट, खवय्यांची मात्र बोकडालाच पसंती
मंगळवार असूनही धुलिवंदनाच्या दिवशी नागपुरात मटण खरेदीसाठी खवय्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. Non Veg lovers prefers Mutton
नागपूर : कोरोना वायरसचा प्रसार कोंबड्यांच्या माध्यमातून होत नसल्याचं पशुसंवर्धन मंत्र्यांनी वारंवार स्पष्ट केलं आहे. मात्र अफवांच्या बाजारात अजूनही चिकनचा दर उतरताच आहे. एकीकडे चिकनचे भाव मातीमोल झाले असताना दसपट किमतीने विक्री होणाऱ्या मटणासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागताना दिसत आहेत. (Non Veg lovers prefers Mutton)
धुलिवंदन आणि मटणाचं नातं मांसाहारप्रेमींना वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यातच ‘कोरोना वायरस’चा अप्रत्यक्ष फटका पोल्ट्री उद्योगांना बसल्यामुळे मटणाचा ‘भाव’ आणखी वधारला आहे. खवय्यांनी चिकनकडे पुरती पाठ फिरवल्यामुळे मटणाची मागणी वाढली आहे, तर चिकनची चांगलीच घटली आहे.
मंगळवार असूनही धुलिवंदनाच्या दिवशी नागपुरात मटण खरेदीसाठी खवय्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. चिकनची मागणी घटल्याचं दिसत असून खवय्यांनी मटणाला पसंती दिली आहे. मागणी वाढल्याने मटणाचा दर नागपुरात 680 रुपये किलोवर पोहचला आहे.
हेही वाचा : कोंबडी ‘ताटातून’ पळाली! कोरोना व्हायरसचा चिकन बाजाराला फटका
नागपुरात चिकनची दुकानं ओस पडली आहेत, तर मटण विक्रेत्यांकडे मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. चिकन जेमतेम 60 रुपये किलोने विकलं जात आहे, तर मटणाची विक्री जवळपास दसपट किमतीला होत आहे. परंतु चिकनमुळे कोरोना पसरण्याच्या अफवेची विनाकारण धास्ती घेतलेल्या मांसाहारींनी चिकनवर अघोषित बहिष्कार टाकला आहे.
चिकनबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी चिकन फेस्टिव्हल्स भरवण्यात येत आहेत. या फेस्टिव्हल्सना खवय्यांची गर्दी दिसत होती. परंतु चिकन विक्रीत अद्यापही घट दिसत आहे.
पोल्ट्री व्यवसायावर काय परिणाम?
चिकनची मागणी घटल्याने चिकन विक्रेते तर अडचणीत आले आहेतच, मात्र पोल्ट्री फार्म चालवणाऱ्या शेतकरी आणि व्यावसायिकांवरही संकट ओढावलं आहे. पोल्ट्री फार्ममधून जे चिकन 40 ते 70 रुपये किलोने खरेदी केलं जायचं, त्याचा दर घसरुन आता 28 रुपये प्रति किलोवर आला आहे.
कोंबडीची छोटी पिल्लं अगोदर 20 ते 25 रुपये दराने विकली जायची, आता ती दहा ते बारा रुपयांवर आली आहेत. त्यामुळे पोल्ट्रीफार्म मालक अडचणीत आले आहेत.
आहारतज्ज्ञ काय सांगतात?
आपल्याकडे चिकन ज्या पद्धतीने शिजवले जाते, त्यानुसार त्यात कोणतेही विषाणू जिवंत राहण्याची शक्यता नाही. याशिवाय कोंबडी किंवा कोणत्याही प्राण्याच्या शरीरात कोरोना व्हायरस असल्याची भारतात चिन्हं नाहीत. त्यामुळे चिकन खाणाऱ्यांनी मनामध्ये अजिबात शंका बाळगू नये, असं आवाहन पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी केलं आहे. मांसाहारींनी अशा अफवांना बळी न पडता चिकन खात राहावं, असं आवाहन केलं जात आहे. (Non Veg lovers prefers Mutton)