डोनाल्ड ट्रम्प यांची घेरेबंदी, भारत, चीन, रशिया आणि जपानचा सुरात सूर
भारत, जपान आणि रशिया यांसारख्या मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांनीही बहुपक्षीय व्यापाराच्या नियमांचा बचाव केला. अमेरिका आणि चीन यांच्यात सध्या व्यापार युद्ध सुरु आहे. त्यातच भारत आणि चीनच्या वस्तूंवर अमेरिका फर्स्ट धोरणांतर्गत मोठ्या प्रमाणात कर वाढवण्यात आलाय.
टोकियो : व्यापार हिच आमची प्राथमिकता असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी G-20 परिषदेत स्पष्ट केलं. तर चीननेही अमेरिकेला त्याच शब्दात उत्तर देत वाढत्या संरक्षणवादाविरोधात इशारा दिलाय. याशिवाय भारत, जपान आणि रशिया यांसारख्या मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांनीही बहुपक्षीय व्यापाराच्या नियमांचा बचाव केला. अमेरिका आणि चीन यांच्यात सध्या व्यापार युद्ध सुरु आहे. त्यातच भारत आणि चीनच्या वस्तूंवर अमेरिका फर्स्ट धोरणांतर्गत मोठ्या प्रमाणात कर वाढवण्यात आलाय.
विकसित देश संरक्षणवादाच्या ज्या धोरणावर चालत आहेत, त्यामुळे सर्वांचंच नुकसान होणार आहे. यामुळे जागतिक व्यापार प्रणाली उद्ध्वस्त होईल. आपल्या सर्व देशांचंही यामुळे नुकसान होत आहे. पूर्ण जगात शांतता आणि स्थिरता संकटात आहे, असं चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग म्हणाले.
चीननंतर रशिया, जपान आणि भारतानेही बहुपक्षीय व्यापार नियमांचा बचाव करत अमेरिकेला सूचक इशारा दिलाय. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या संरक्षणवादाच्या धोरणामुळे स्वतःच घेरले जात असल्याचं चित्र आहे. G-20 समिटपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्याशीही चर्चा केली. आपण काही मोठ्या घोषणा करणार आहोत. उद्योग आणि निर्मिती क्षेत्रात भारतासोबत आम्ही अनेक मोठ्या गोष्टी करत आहोत, असंही ट्रम्प म्हणाले.
शनिवारी डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांचीही बैठक होणार आहे. यावेळी दूरसंचार कंपनी हुवावेबाबतही चर्चा होऊ शकते. हुवावे कंपनीचं 5G नेटवर्क रोखण्यासाठी अमेरिकेने दबाव टाकलाय. हुवावे ही चीनची मोठी कंपनी आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत हा मुद्दाही चर्चेला घेतला जाऊ शकतो.