कोरोनामुळे डॉक्टर अंत्यदर्शनही घेऊ देत नाहीत, आजोबांचे पार्थिव घरी न्या, एसटीत मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाच्या नातीचा गोंधळ
उस्मानाबादच्या वसंत देडे यांचा सोलापूरजवळ एसटी बसमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला

सोलापूर : सोलापुरात राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये वृद्धाचा दुर्दैवाने मृत्यू झाला. वृद्धाच्या मृत्यूनंतर मृतदेह सरकारी दवाखान्यात घेऊन जाण्यास नकार देत त्यांच्या नातीने बसच्या दरवाजातच मोठा गोंधळ घातला. कोरोनामुळे डॉक्टर अंत्यदर्शनही घेऊ देत नाहीत, त्यामुळे आजोबांचे पार्थिव घरी न्या, असा धोशा नातीने लावल्यामुळे प्रशासनाचीही मोठी दमछाक झाली. (Osmanabad Old man dies at Solapur in ST Bus Grand Daughter forces to take dead body to native place)
उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरुम ते पुणे ही राज्य परिवहन महामंडळाची बस मुरुम स्थानकातून निघाली. या बसमधूनच वसंत देडे आणि त्यांची नात पुण्याला जाण्यासाठी प्रवास करत होते. मात्र बसमध्ये प्रवास करत असतानाच बोरामणी गावाजवळ पोहोचल्यानंतर वसंत देडे यांना उलटी झाली आणि हृदयविकाराचा झटका आला. यातच दुर्दैवाने वसंत देडे यांचा मृत्यू झाला.
प्रसंगावधान राखत एसटीचे वाहक आणि चालकांनी बस थेट सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेली, मात्र नातीने रुग्णालयात दाखल करण्यास मोठा विरोध केला. मला आजोबांना आमच्या गावी घेऊन जाऊ देत, असा आग्रह तिने धरला होता. एसटीच्या दरवाजामध्ये थांबून ती आजोबांचा मृतदेह बाहेर काढायला विरोध करत होती.
“डॉक्टर आजोबांना कोरोना आहे असं सांगून त्यांचा मृतदेह परस्पर विल्हेवाट लावतील. त्यामुळे आम्हाला आजोबांचं अखेरचं दर्शनही करता येणार नाही, त्यामुळे मला माझ्या आजोबांना माझ्या गावी घेऊन जाऊ दे” असा हट्ट तिने धरला. नातीच्या हट्टापुढे प्रशासनाचीही मोठी दमछाक झाली. पोलिसांच्या मदतीने नंतर एका खासगी रुग्णवाहिकेतून वसंत देडे यांचा मृतदेह आणि त्यांच्या नातीला मुरुमकडे रवाना करण्यात आले.
VIDEO : Corona Update | राज्यात कोरोना रुग्णांचे पोस्टमार्टेम? राज्य सरकारकडे प्रस्ताव विचाराधीनhttps://t.co/T0tAZiOpQv
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 2, 2020
(Osmanabad Old man dies at Solapur in ST Bus Grand Daughter forces to take dead body to native place)
दरम्यान, मुंबईतील बेस्टच्या दिमतीला गेलेल्या सोलापुरातील एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. भगवान गावडे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. गावडे हे सोलापुरातील मंगळवेढा आगारात वाहक म्हणून काम करत होते.
मुंबईत बेस्ट बसची सेवा देण्यासाठी सोलापूर विभागातील 100 एसटी कर्मचारी गेले होते. काही दिवसांपूर्वी ते सर्व कर्मचारी सोलापुरात परतले. यानंतर मंगळवेढा आगारातील वाहक भगवान गावडे यांना मूळव्याधीचा त्रास होत होता. तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली.
वाहतूक नियंत्रक आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना उपचार मिळावा यासाठी वारंवार तक्रार केली होती. मात्र त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने भगवान गावडे यांचा कुर्ला येथील रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान भगवान गावडे यांच्या मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समोर आलेलं नाही.
संबंधित बातम्या :
(Osmanabad Old man dies at Solapur in ST Bus Grand Daughter forces to take dead body to native place)