सांगली/अहमदनगर : रॅगिंगमुळे पायल तडवी या युवा डॉक्टरने जीव गमावल्याचं संपूर्ण देशाने पाहिलं. वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना रॅगिंगला कंटाळून तिने आत्महत्या केली. पायलबरोबर जे घडलं तेच माझ्याही मुलीसोबत घडलं असावं, असा संशय श्रीरामपूरमधील 19 वर्षीय पल्लवीच्या पालकांना आहे. कारण, संध्याकाळी फोनवर बोललेल्या मुलीच्या निधनाचं वृत्त आई-वडिलांना समजलं आणि पायाखालची जमीन सरकली. पायल पंडीत या तरुणीचा जीव जाऊन जवळपास पाच महिने उलटले आहेत. पण मुलीचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत अजून कोणतंही ठोस उत्तर पालकांना मिळालेलं नाही. यासाठी रोज पोलिसांना फोन लावून ते माहिती घेतात. पण समाधानकारक उत्तर मिळत नाही.
पीडित कुटुंब अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे वास्तव्यास आहे. त्यांची एकुलती एक मुलगी पल्लवी सांगली जिल्ह्यातील मिरज येथील वॉन्लेस हॉस्पिटल, मिरज मेडीकल सेंटर येथे फिजिओथेरेपीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. तेथील कॉलेजच्या होस्टेलवर ती राहत होती. 7 फेब्रवारी 2019 रोजी होस्टेलच्या बाथरुममध्ये तिचा मृतदेह आढळल्याचं कॉलेज प्रशासनाकडून पल्लवीच्या आई- वडिलांना कळवण्यात आलं.
पल्लवी पंडीत हिचा मृत्यू संशयास्पद असल्याचं तिचे वडील सुनिल पंडीत आणि आई ज्योती पंडीत यांना वाटतं. तिचा घातपात झाला का? किंवा तिने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली का? असे एक ना अनेक प्रश्न पल्लवीच्या आई-वडिलांना सतावत आहेत. हुशार हसत-खेळत असलेली आपली मुलगी आता या जगात नाही या विचाराने आई-वडिलांचे अश्रू अजूनही थांबता थांबत नाहीत. या संशयास्पद घटनेचा तपास लावावा आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी पल्लवीचे आई-वडील करत आहेत.
सुनिल आणि ज्योती पंडीत यांना दोन अपत्य आहेत. मोठा मुलगा आणि धाकटी पल्लवी. सुनिल हे पुणतांबा येथे आशा केंद्रात व्यवस्थापन विभागात नोकरीस आहेत. आई ज्योती या एमआयडीसीत एका खासगी कंपनीत काम करतात. जेमतेम 20 हजार महिन्याची कमाई, त्यात दोन मुलांचं शिक्षण…भाडे तत्वावरील एका साध्या खोलीत राहून पोटाला चिमटे घेऊन मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी त्यांनी जमेल ते केलं. मुलीला फिजिओथेरेपीला प्रवेश मिळाल्याने सर्व खुश होते. सर्व आनंदात सुरू असताना अचानक 7 फेब्रवारीला फोन आला आणि पल्लवीच्या मृत्यूने कुटुंब सुन्न झालं.
कॉलेज प्रशासनाचा निष्काळजीपणा, न पटणारी उत्तरं, त्यात गेल्या साडे चार महिन्यात पल्लवीच्या मृत्यूचं ठोस काहीच कारण समजत नसल्याने पंडीत कुटंबीय न्याय मागत आहे. पोलिसांनी शवविच्छेदनाचा उच्चस्तरीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार तपास करण्याचं सांगितलंय. पल्लवीच्या मृत्यू प्रकरणाचं गूढ उकलावं हीच माफक अपेक्षा तिचे कुटुंबीय व्यक्त करत आहेत. पोलिसांनीही या प्रकरणावर बोलण्यास नकार दिलाय. पोटचं लेकरु गमावूनही आई-वडिलांना तिच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी सरकारी उंबरठे झिजवावे लागत आहेत.