… तर थेट गुन्हे दाखल करा, पंकजांचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
राज्यात पावसाने हजेरी लावली असली तरी अनेक ठिकाणी अजूनही पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. बीडमधील परळीत देखील असाच प्रश्न आहे.
बीड: राज्यात पावसाने हजेरी लावली असली तरी अनेक ठिकाणी अजूनही पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. बीडमधील परळीत देखील असाच प्रश्न आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या ताब्यातील नगरपरिषदेकडून शहरातील नागरिकांना पाणी वाटप करताना भेदभाव होत असल्याचा आरोप होत आहे. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर महिला बालविकास मंत्री आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रशासनाला भेदभाव खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच स्वतः संबंधित प्रभागात येऊन पाणी वाटप केले.
परळीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाऊस नसल्याने शहराला पाणी पुरवठा करणारे वाण धरण कोरडेठाक पडले आहेत. यानंतर प्रशासनाकडून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर मंजूर करण्यात आले. मात्र, नगरपरिषदेने पाणी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. याबाबत संबंधित नागरिकांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे तक्रारही केली. मुंडे यांनी तात्काळ तहसीलदार विपीन पाटील आणि मुख्याधिकारी अतुल मुंडे यांना भेदभाव खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच भेदभाव झाल्यास कडक कारवाई करण्याचाही इशारा दिला.
पंकजा मुंडे एवढ्यावरच थांबल्या नाही. त्या आज सकाळीच प्रभाग क्रमांक 6 मधील पद्मावती गल्लीत पोहोचल्या. तसेच नगरपरिषदेचे टँकर बोलावून रहिवाशांना स्वतः पाणी वाटप केले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
मुंडे म्हणाल्या, “नागरिकांना पाणी वाटप करताना राजकारण किंवा भेदभाव खपवून घेणार नाही. पालकमंत्री म्हणून मी स्वतः टॅंकर मंजूरीचे आदेश दिले आहेत. हे टँकर सरकारचे आहेत, त्यात इतरांचा काहीही संबंध नाही. उगाच लुडबुड करून कुणीही फुकटचे श्रेय लाटू नये. सर्व स्तरातील नागरिकांना पाणी मिळाले पाहिजे.” यावेळी त्यांनी भेदभाव करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांना दिले.